महाविकास आघाडी मधील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ सोडला जाईल. असे जवळपास निश्चित मानले जाते आहे. मागील काही दिवसांपासून प्रेस कामगार नेते जगदीश गोडसे व सामाजिक कार्यकर्ते अतुल मते यांनी या मतदार संघात निवडणूकीची तयारी सुरू केली आहे. पण निवडणुकीचे बिगुल वाजताच दोघांच्या नावाऐवजी भलत्याच नावाची चर्चा राष्ट्रवादीत दबक्या आवाजात केली जात आहे. निष्ठावंत कार्यकर्ते मात्र या चर्चेने अस्वस्थ झालेले दिसतात. पक्षाने गोडसे किंवा मते यांच्यापैकी कोणताही एक उमेदवार दयावा, आम्ही प्रामाणिकपणे त्यांचे काम करू, पण पैशाने गब्बर असलेला भाजपचा आयात उमेदवार देऊ नये, अशी अपेक्षा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी मतदान होईल. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीचे बिगुल वाचताच नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये संभाव्य उमेदवारांच्या नावाची चर्चा पुढे येऊ लागली आहे. यामध्ये अपेक्षेप्रमाणे जगदीश गोडसे आणि अतुल मते यांचे नाव आहे. परंतु ऐनवेळी भाजपमधील पैशाने गब्बर असलेल्या एका बड्या नेत्याच्या नावाची पण चर्चा रंगत आहे. भाजपच्या या नेत्याच्या हातात बऱ्याच काळ महापालिकेच्या तिजोरीची चावी होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे या नेत्याने नाशिक पूर्व मधून उमेदवारीची मागणी केली असल्याचे बोलले जात आहे. या चर्चेला नाशिक मधील राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी दुजोरा देत आहे. भाजप नेत्याची रंगलेली चर्चा खरी असेल तर राष्ट्रवादीचे निष्ठावंत पदाधिकारी कार्यकर्ते काय भूमिका घेतात, याकडे लक्ष असणार आहे.
गोडसे यांच्या कष्टाचे काय ?
प्रेस कामगार नेते जगदीश गोडसे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये भव्य कामगार मेळावा घेतला. साधारण दीड वर्षापासून जगदीश गोडसे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचार करीत आहे. शरद पवार तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या ते सतत संपर्कात आहेत. मतदारसंघात त्यांनी बऱ्यापैकी प्रचार देखील केलेला दिसतो. प्रचारादरम्यान गोडसे यांचा खर्चही मोठ्या प्रमाणात झालेला असू शकतो. मागील काही दिवसांपासून गोडसे यांनी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नावाची चर्चा सुरू ठेवली आहे. राष्ट्रवादीचे निवडणूक मार्केटिंग उत्तम प्रकारे केलेले आहे. असे असताना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ऐनवेळी निवडणुकीच्या तोंडावर गोडसे यांना टाळून भाजपच्या बड्या नेत्याला उमेदवारी दिली, तर त्याचे काय पडसाद उमटू शकतात. याचा विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अगोदर करायला हवा.
तर मते यांच्या पुढे समस्या
आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या भाजपच्या एका बड्या नेत्याने राष्ट्रवादीकडून नाशिक पूर्व मतदार संघामधून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. तेव्हापासून स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमवस्था निर्माण झालेली दिसते. साधारण एक वर्षापासून अतुल मते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक तयारीला लागलेले आहे. एक वर्षापासून ते सतत जनतेच्या संपर्कात आहे. वेगवेगळे उपक्रम,कार्यक्रम राबवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव घराघरापर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. राष्ट्रवादीसाठी मतदार संघात निवडणूक पूर्व वातावरण तयार केले. गोडसे यांच्या प्रमाणे मते प्रचारात सक्रिय झालेले दिसतात. थोडक्यात निवडणूक पूर्व वातावरण गोडसे आणि मते यांच्याकडून तयार करून घ्यायचे, अन् प्रत्यक्षात उमेदवारी भाजपमधील एका बड्या पैसेवाल्या नेत्याला दिली गेली तर यामधून चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्याचा विपरित परिणाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढत असलेल्या जिल्ह्यातील इतर मतदारसंघावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जमिनीची मशागत एकाने करायची, पेरणी दुसऱ्याने अन् पिकांचा मोबदला तिसऱ्यानेच घ्यायचा,अशी एकंदरीत परिस्थिती गोडसे आणि मते यांना उमेदवारी नाकारल्यानंतर तर होणार नाही ना? याचा विचार राष्ट्रवादीच्या सुज्ञ पदाधिकाऱ्यांनी करायला हवा.