नाशिक, प्रतिनिधी
नाशिक लोकसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांनी प्रचंड मतांनी विजय मिळविला. दणदणीत विजयामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारल्याचा दिसतो आहे.त्याचा परिणाम म्हणून नाशिक लोकसभा अंतर्गत असणाऱ्या सहा विधानसभापैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राष्ट्रीय काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे पक्ष प्रत्येकी दोन जागा लढविणार आहे. अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. कोणत्या पक्षाला कुठले विधानसभा मतदार संघ वाट्याला येणार, याविषयीची महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे नियोजन झाल्याचे बोलले जाते आहे.
नाशिक लोकसभा मतदार संघामध्ये विधानसभेचे सहा मतदार संघ आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, इगतपुरी – त्रंबक, देवळाली आणि सिन्नर मतदार संघ आहे. विद्यमान खासदार राजाभाऊ वाजे यांना सिन्नर विधानसभेतून जवळपास एक लाख तीस हजाराच्या आसपास मतांची आघाडी मिळाली. यानंतर देवळाली आणि इगतपुरी मतदार संघात साधारण चाळीस हजारांच्या पुढे आघाडी मिळालेली आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघांमध्ये आठ हजारांच्या आसपास आघाडी आहे. नाशिक पूर्व आणि नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात राजाभाऊ वाजे यांना आघाडी मिळालेली नाही. विशेष म्हणजे देवळाली मतदार संघात वाजे यांना आघाडी मिळाल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हेमंत गोडसे यांचा बालेकिल्ला असताना त्या ठिकाणी वाजे यांना आघाडी मिळाली, हे विशेष मानले जात आहे.
लोकसभेत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आगामी विधानसभेच्या निवडणुकीची व्युहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. नाशिक लोकसभेतील सहा विधानसभा मतदार संघापैकी प्रत्येकी दोन मतदार संघ वाट्याला येणार आहे. यापैकी सिन्नर आणि नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडण्यात येणार आहे. नाशिक पूर्व आणि देवळाली विधानसभा मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिले जाणार आहे. तर नाशिक मध्य आणि इगतपुरी विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला सोडला जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे. यामध्ये सत्यता कितपत आहे. याविषयी थोडा वेळ जावा लागेल.