दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे अँक्शन मोड आले आहेत, त्यांनी नांदगाव तालुक्यातील खादगाव येथे वीज पडून मृत्यूमुखी झालेल्या विलास गायकवाड यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. केंद्र व राज्य सरकार तर्फे मदत मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी खासदार भास्कर भगरे यांनी दिले आहे.
वीज पडून मृत्यू झाल्यास त्याचा राज्य आपत्ती विभागाच्या यादीत समावेश करण्यात येत असतो. अशा घटनांत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसाना चार लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाते.
या संदर्भातील आदेश महसूल खात्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने जारी केले आहे. राज्यात पावसाळ्यामध्ये वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानांकानुसार वीज पडून होणाऱ्या मृत्युचा समावेश नैसर्गिक आपत्तींच्या यादीत नव्हता. त्यामुळे मरण पावलेल्या व्यक्तीच्या वारसदारांना मदत देता येत नव्हती. दरम्यान या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दि. ३१ मे रोजी झालेल्या बैठकीत वीज पडून झालेले मृत्यू ही राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूचना विचारात घेऊन वीज पडून मृत्यू होण्याच्या घटनांचा समावेश राज्य आपत्तीच्या यादीत करण्यात आला आहे.वीज पडून मृत्यू झाल्यास योग्य त्या प्राधिकाऱ्याने मृत्यूचे कारण प्रमाणित करण्याच्या अधीन राहून मरण पावलेल्यांच्या वारसांना चार लाख रुपये मदत दिली जाणार आहे. खासदार भास्कर भगरे यांनी स्व. विलास गायकवाड यांच्या कुटुंबियांना मदत मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही दिली. याप्रसंगी गणेश भाऊ धात्रक, संतोष गुप्ता, निलेश चव्हाण, दर्शन आहेर ह्या सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.