नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली आहे.शिक्षक मतदार संघामधून शिवसेनेने म्हणजेच महाविकास आघाडीने एड.संदीप गुळवे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतर्फे गुळवे हेच उमेदवार राहतील, असे चित्र स्पष्ट झाले आहे. तर मागील नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत शिवसेनेकडून निवडणूक लढवून आमदार सत्यजित तांबे यांना कडवी झुंज देणाऱ्या शुभांगी पाटील देखील इच्छुक आहेत. शिवसेनेने त्यांना टाळल्यामुळे त्या नाराज आहेत. त्याचप्रमाणे शिक्षक मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुभाष गुजर ट्रस्टचे सचिव रतन चावला इच्छुक आहेत. त्यामुळे शिक्षक मतदार संघात या वेळेला महाविकास आघाडीत बिघाडी होते की काय ?, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत या वेळेला शिक्षकांऐवजी संस्थाचालक निवडणूक रिंगणात अधिक प्रमाणात उतरणार असल्याचे दिसून येत आहे. नाशिक जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. गोपाळराव गुळवे यांचे चिरंजीव ऍड. संदीप गुळवे हे मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून ते निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्यांनी निवडणूक लढविण्यासाठी जोरदार तयारी देखील केलेली आहे. यासंदर्भात मुंबई येथे खासदार संजय राऊत यांची भेट घेत शिवसेनेत प्रवेश देखील केला आहे. संजय राऊत यांनी गुळवे यांची उमेदवारीला हिरवा कंदिल दर्शविला आहे. राऊत यांच्या भेटीमुळे शिवसेनेची उमेदवारी ऍड. गुळवे यांना जाहीर झाल्याचे सगळीकडे वातावरण निर्माण झाले आहे. तर शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यानदेखील शिक्षक मतदार संघामधून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. त्यांनी देखील गाठीभेटी आणि निवडणूक तयारीला सुरूवात केलेली दिसते. नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत त्यांनी विद्यमान आमदार सत्यजित तांबे यांच्या विरोधात निवडणूक लढवलेली आहे. त्यावेळी राजकीय दृष्टीने वजनदार असलेल्या तांबे यांना त्यांनी कडवी झुंज दिल्याचे सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. त्यांनी पुन्हा एकदा शिक्षक मतदार संघात उमेदवारीसाठी दावा केल्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पुढे मोठा पेच निर्माण झालेला दिसतो.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे देवळाली कॅम्प येथील सुभाष गुजर संस्थेचे सचिव रतन चावला इच्छुक आहे. निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. आपण निवडणूक लढविणार असून शिक्षकांनी आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी त्यांची मागणी आहे. आपल्याला शिक्षकांच्या समस्या अन अडचणींची चांगल्या प्रकारे जाणीव आहे. त्या सोडवण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करीत आलो आहोत, कोणत्याही परिस्थितीत आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. या संदर्भातील त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. त्याची चर्चा सर्वत्र केली जात आहे. त्यामुळे या वेळेला शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे पाहायला मिळू शकते.