येथील प्रभाग १७ मध्ये भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी माजी नगरसेवक प्रशांत दिवे आणि मंगेश मोरे इच्छूक आहे.दोघांपैकी कुणाला उमेदवारी मिळेल हे आजच्या घडीला निश्चित नाही.परंतु दोघेही निवडूण येण्याची क्षमता असणारे आणि प्रबळ दावेदार मानले जातात.त्यामुळे उमेदवारीसाठी नेमकी कुणाला पसंती द्यावी,असा पेच भाजपच्या निवड समितीपुढे निर्माण होऊ शकतो. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतर्फे सुशिक्षित आणि शांतता प्रिय प्रतिमा असणारे मनसेचे प्रमोद साखरे इच्छूक आहेत.त्यांना आघाडी अंतर्गत तुल्यबळ स्पर्धक नाही. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. थोडक्यात यावेळेला अनुसूचित जाती प्रवर्गातील राजकीय लढाई अंत्यंत चुरशीची अन् राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची होऊ शकते.
नाशिकरोड विभागातील प्रभाग १७ मधील अनुसूचित जाती प्रवर्गातील निवडणूक यंदा प्रचंड लक्षवेधक ठरणार आहे. भाजपकडून माजी नगरसेवक प्रशांत दिवे इच्छूक आहे. मागील वीस वर्षापासून प्रशांत दिवे नाशिकरोडच्या राजकारणात स्थिरावलेले दिसतात.स्वकर्तुत्वावर त्यांनी नाशिकरोडच्या राजकारणात आपले नाव उंचावलेले आहे. सर्वपक्षीय नेत्यांसोबत त्यांनी मैत्रीचे संबंध निर्माण केले आहे. नाशिकरोड प्रभाग सभापती पद त्यांनी भूषविलेले आहे. सभापती असताना त्यांनी आपल्या प्रशासकीय कौशल्याची छाप अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निर्माण केली होती. डॅशिंग युवा नेता अशी त्यांची प्रतिमा मानली जाते. प्रभागात सार्वजनिक कार्यक्रमात, उपक्रमात सतत सहभागी असतात. त्यांच्या कार्यकाळातील विकासकामांच्या जोरावर त्यांनी भाजपकडून उमेदवारी मिळविण्यासाठी दावा केला आहे. त्यांना उमेदवारीसाठी मंगेश मोरे मुख्य स्पर्धक आहे. मंगेश मोरे यांच्या मातोश्री स्व. सुनंदा मोरे भाजपच्या माजी नगरसेविका आहे.माजी आमदार बाळासाहेब सानप भाजपचे शहराध्यक्ष असताना त्यांच्या कृपादृष्टीने तसेच मार्गदर्शनाखाली झालेल्या पोटनिवडणुकीत सुनंदा मोरे यांनी विजय प्राप्त केलेला होता. मंगेश मोरे यांच्याकडे कॅनॉल रोड झोपडपट्टीतील एकगठ्ठा मतदान हे त्यांचे प्रमुख वैशिष्टे मानले जाते. तरुणांचे पाठबळ आणि भाजपकडे मुस्लिम मतदार खेचण्याची ताकत त्यांच्यात असल्याची चर्चा केली जाते. मागील निवडणुकीत दिवे आणि स्व.सुनंदा मोरे आमने सामने होते. मोरे भाजपकडून तर दिवे शिवसेनेचे उमेदवार होते. यावेळेला मात्र दोघेही भाजपकडून इच्छूक आहे.प्रशांत दिवे आणि मंगेश मोरे यांच्यापैकी कुणाला उमेदवारी द्यावी ते ठरविताना निवड समिती कोणते निकष लावते. ते पाहावे लागेल. दोघेही ताकदीचे उमेदवार असल्याने भाजपच्या नेत्यांपुढे उमेदवारी देताना पेच निर्माण होऊ शकतो.
महाविकास आघाडीचे ठरले ! माहाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाले तर मनसेचे प्रमोद साखरे यांना अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारी मिळू शकते. त्यांना दुसरा कोणीही स्पर्धक नाही. कदाचित महाविकास आघाडी झाली नाही तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांच्या युतीचे साखरे संभाव्य उमेदवार ठरू शकतात. थोडक्यात युती असो अथवा महाविकास आघाडी त्यांचे उमेदवार प्रमोद साखरे असल्याचे जवळपास निश्चित मानले जाते. साखरे पूर्वाश्रमीचे मनसेचे निष्ठावंत सैनिक मानले जातात. जून जाणते मनसेचे पदाधिकारी आहे. त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचे स्वपक्षीय वरिष्ठ नेते सक्रिय दिसतात.कोणत्याही परिस्थितीत नाशिक रोड परिसरातून महाविकास आघाडीचे उमेदवार साखरे हेच राज राहतील असा निश्चय मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा आहे. मागील पाच वर्षापासून साखरे यांनी प्रभागात संपर्क ठेवलेला आहे. सतत सामान्य जनतेच्या संपर्कात असतात. त्यांना मानणारा एक वर्ग त्यांनी प्रभागात निर्माण केलेला दिसतो.छुपा प्रचार करण्यावर त्यांचा कल दिसतो. अनुसूचित जाती प्रवर्गातून प्रभाग १७ मधून भाजपला ते तगडे आवाहन देऊ शकतात. त्यांच्यात तेवढी क्षमता असल्याचे बोलले जात आहे.
… तर चुरशीची तिरंगी लढत अपेक्षित ! भाजप तर्फे प्रशांत दिवे किंवा मंगेश मोरे यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळणार आहे. भाजपने उमेदवारी टाळलेले इच्छूक शिंदे गटाच्या शिवसेनेकडून किंवा महाविकास आघाडी कडून चाचपणी करू शकतात. महाविकास आघाडीकडून साखरे प्रबळ दावेदार असल्याने भाजपने उमेदवारी नाकारलेल्या इच्छुकाला शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारीसाठी प्रयत्न करावे लागतील. तसे झालेच तर अनुसूचित जाती प्रवर्गातून चुरशीची तिरंगी लढत अपेक्षित दिसते. यात कोण बाजी मारणार हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल.