भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक विशाल संगमनेरे यांची राजकीय कोंडी करण्यासाठी विरोधक एकवटलेले दिसतात. त्यांच्या पराभवासाठी मोर्चेबांधणी केली जात असल्याची चर्चा आहे. माजी नगरसेवक ॲड सुनील बोराडे आणि अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे योगेश निसाळ निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. त्यांच्याकडून विजयासाठी प्रभागात व्यूहरचना आखली जात आहे. दुसरीकडे राजकीय दृष्टीने परिपक्व बनलेले विशाल संगमनेरे आणि त्यांच्या समर्थकांची देखील जोरदार तयारी दिसते. त्यांच्याकडून दुसऱ्यांदा विजयाचे शिवधनुष्य उचलण्याची जंगी तयारी सुरू असल्याचे दिसते.
जेलरोड परिसरात प्रभाग १८ राजकीय दृष्टीने लक्षवेधक ठरू शकतो. तसे संकेत मिळताना दिसतात. नगरसेवक पदाचे प्रबळ दावेदार असणारे विशाल संगमनेरे यांचे समर्थक आपल्या लाडक्या विशाल अण्णांना पुन्हा एकदा नगरसेवक पदावर बसविण्यासाठी तयारीला लागलेले दिसतात. मागील पंचवार्षिक निवडणुकीत बाहेरून येऊन त्यांनी स्थानिक आणि राजकिय दृष्टीने प्रतिष्ठित असलेल्या नामवंताना पराभवाला सामोरे जाण्यास भाग पाडले. एवढेच नाही तर विशाल संगमनेरे यांनी उत्तमप्रकारे राजकीय प्रस्त या भागात निर्माण केले. शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून परिसरात लोकप्रियता मिळवली. प्रभागात आपले राजकीय सामाजिक नेटवर्क निर्माण केले. थोडक्यात मागून येऊन त्यांनी आपले राजकीय साम्राज्य उभे केले. मागील काही दिवसांत त्यांनी पूर्वाश्रमीचे पारंपरिक राजकीय नेत्यांना घरी बसायला भाग पाडलेले दिसते.दिवसेंदिवस राजकारणात वाढणारे त्यांचे वर्चस्व स्थानिक पाटील मंडळीच्या डोळ्यात खुपत असल्याची चर्चा दबक्या आवाजात होताना दिसते.
विशाल संगमनेरे यांचे वाढणारे राजकीय महत्व कमी करून त्यांचे राजकीय खच्चीकरण करण्यासाठी विरोधक एकवटलेले दिसून येत आहे. माजी नगरसेवक सुनील बोराडे यांच्या पाठीमागे जनाधार उभा केला जातो आहे. ते उच्च शिक्षित आणि अभ्यासू आहे. संगमनेरे यांना केवळ बोराडे हेच अटीतटीची लढत देऊ शकतात. निवडणुकीत विशाल संगमनेरे यांचा पराभव करण्याची क्षमता सुनील बोराडे यांच्या मध्ये असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सर्व राजकीय विरोधकांकडून बोराडे यांचे नाव पुढे केले जात आहे. बोराडे यांच्या सोबत पॅनल तयार करून जबरदस्त हादरा विशाल संगमनेरे यांना देण्याची तयारी सुरू दिसते. बोराडे यांचा प्रभागात जनसंपर्क असून राजकीय दांडगा अनुभव असल्याने एकमुखाने बोराडे यांचे नाव पुढे केले जात आहे.
राष्ट्रवादीकडून योगेश निसाळ दावेदार
अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून योगेश निसाळ प्रबळ दावेदार मानले जातात. तरुण सुशिक्षित नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मागील पाच वर्षापासून त्यांनी सतत उपक्रम, कार्यक्रम प्रभागात राबविलेले दिसतात. विशेष करुन त्यांनी टँकरद्वारे मोफत पिण्याच्या पाण्याची सुविधा गरजू नागरिकांना उपलब्ध करून दिली. वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण उपक्रम आणि कार्यक्रमांमुळे अल्पावधित प्रभागात त्यांचा नावलौकिक वाढून ते प्रसिध्दीच्या झोतात आलेले दिसतात.
विरोधकांकडून प्रचार
विशाल संगमनेरे यांना कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी काही मुद्दे चर्चेत ठेवले आहे.यामध्ये काही दिवसांपासून संगमनेरे यांचा प्रभागातील नागरिकांसोबत जनसंपर्क नाही ते सतत विदेशात म्हणजेच दुबई मध्ये असतात.प्रभागात मूलभूत सुविधांच्या अभाव असून संगमनेरे यांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा प्रचार विरोधकांकडून केला जातो आहे