नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी ( दि.२० ) मुंबई येथील राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे भुजबळ यांची पुन्हा एकदा राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. भुजबळ समर्थकांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान अंजली दमानिया आणि जरांगे पाटील यांनी याविषयी बोलताना टीका केली. जरांगे पाटील म्हणाले की,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आगामी काळात याची मोठी किंमत मोजावी लागेल अशी टीका करून जिल्हा परिषद, महापालिका,नगरपालिका, पंचायत समिती निवडणूक तोंडावर त्यांची वर्णी लागल्याचे भाष्य केले.
राज्यात ओबीसी समाजाचे नेते म्हणून छगन भुजबळ ओळखले जातात. मागील काही दिवसांपासून भुजबळ आणि अजितदादा पवार यांच्यामध्ये कमालीचे मतभेद निर्माण झाले होते.राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी दरम्यान भुजबळ यांना डावलण्यात आले होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित दादा आणि भुजबळ यांच्यातील मतभेद टोकाला गेलेले होते.परंतु मंगळवारी अचानक भुजबळ यांचा मुंबईतील राजभावनात सकाळी दहा वाजता शपथविधी झाला. त्यांच्याकडे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे अन्न व नागरी पुरवठा हे खाते दिले जाईल असे बोलले जाते. दरम्यान भुजबळ यांच्या मंत्रीपदाच्या शपथविधीनंतर नाशिक जिल्ह्याला तीन मंत्री मिळाले आहे. त्याचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी व्हावा अशी अपेक्षा नाशिककरांची आहे.
शेवट चांगला तर सर्व चांगले ; छगन भुजबळ
राज्याच्या मंत्रिमंडळात पुन्हा वर्णी लागल्यानंतर भुजबळ यांनी प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की शेवट चांगला तर सर्व चांगले. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांचे मी आभार मानतो.
पालकमंत्री पदासाठी दावा !
नवनिर्वाचित मंत्री भुजबळ हे नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आहेत. त्यांनी पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात नाशिक शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान दिले आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रशासनावर त्यांची उत्तम पकड असल्यामुळे त्यांना नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री मिळू शकते. असा दावा त्यांच्या समर्थक कांकडून केला जातो आहे. त्यामुळे आगामी काळात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर खरोखरच भुजबळ यांना नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळणार का ? हे पहावे लागेल.