जय भवानी रोड परिसरातील लोणकर मळ्यात बिबट्यांचा मुक्त संचार आढळून आला.रात्रीच्या सुमारास दोन बिबट्यांचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. सोमवारी ( दि.२३ ) रात्री ही घटना उजेडात आली. वनविभागाने तातडीने दखल घेत बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजऱ्यांची व्यवस्था केली. बिबट्यांचे दर्शन झाल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
या ठिकाणी कायम बिबट्याचा वावर असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. येथे वेळोवेळी बिबट्यांचे दर्शन होते. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये बिबट्यांचा मुक्त संचार असल्याचे अनेक वेळा स्पष्ट झाले आहे. बिबट्यांचा मुक्काम कायम असल्याने नागरिक दहशतीच्या छायेत वावरताना दिसतात.दरम्यान याप्रश्नी मनसेचे शहर उपाध्यक्ष नितीन पंडित यांनी वनपाल अहिरराव यांच्यासोबत संपर्क साधला. येथे त्वरित पिंजऱ्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली. वनविभागाने गांभीर्य लक्षात घेत तातडीने लोणकर मळा परिसरात पिंजऱ्याची व्यवस्था केली. बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्यासाठी वन विभागाने रात्रीची गस्त करावी अशी मागणी मनसेचे नितीन पंडित यांनी केली आहे.
यामुळे बिबट्यांचा संचार
डोबी मळा, जय भवानी रोड, लोणकर मळा तसेच वालदेवी नदीच्या पात्रालगत कायम बिबट्याचा वावर असतो. येथे लष्कराचे तोफखाना केंद्र तसेच जंगल आहे. बिबट्याच्या संचारासाठी,वावरासाठी येथे पोषक वातावरण आहे.त्यामुळे या परिसरात स्थानिक नागरिकांना सतत बिबट्याचे दर्शन होते. वन विभाग व नागरिकांना बिबट्याच्या उपद्रवामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे.