विधानसभा निवडणुकीत काही मतदार संघात मुस्लिम, दलीत सहकाऱ्यांच्या मदतीने उमेदवार उभे करू, अशी भुमिका मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी घेतली होती. पण सहकाऱ्यांनी उमेदवारांची नावे वेळेत दिली नाही, त्यामुळे केवळ एका जातीवर निवडणूक लढविणे शक्य नाही. त्यामुळे मराठा बांधवांनी अर्ज मागे घ्यावेत, माझा कोणत्याही मतदारसंघात कुणालाही पाठिंबा नाही, कोणीही कितीही दावा करीत असेल तरी त्यांना माझा पाठिंबा नाही, अशी स्पष्ट भूमिका अंतरवाली सराटी येथे सोमवारी ( दि. ४ ) झालेल्या पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी मांडली.
विधानसभा निवडणुकीमध्ये आपली भूमिका काय असेल याविषयी देखील जरांगे पाटील यांनी आपले मत व्यक्त केले. पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी सांगितले की, मी कुणालाही विजयी करा, किंवा कोणालाही पाडा, असे म्हणणार नाही. जो उमेदवार मराठा ओबीसी मधील आरक्षणाला पाठिंबा देईल, त्याला आमचा पाठिंबा असणार आहे .आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या उमेदवारांना आमचा पाठिंबा नसेल, ही सुरुवातीपासून घेतलेली आपली भूमिका कायम आहे.
नांदूर नाका परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी लॉन्स
मला राजकारणाची थोडीफार जाण
एका जातीच्या ताकतीवर निवडणूक लढविणे हे महाराष्ट्रात कदापि शक्य नाही. राजकीय पक्ष असो किंवा कोणी असोत एका जातीवर निवडणूक जिंकणे शक्य नाही. दलित व मुस्लिम समाजाचा त्यासाठी पाठिंबा आवश्यक आहे. एका जातीच्या आधारावर निवडणूक लढविणे म्हणजे आपले हसू करून घेण्यासारखे आहे. थोडीफार राजकारणाची मला देखील जाण आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक लढविणार नाही हे निश्चित आहे.
निवडणुक लढविणार नाही पण…
निवडणुकीतून माघार घेतली म्हणजे आमचे आंदोलन थंड झाले असे नाही. निवडणुक दरम्यान कोणी आम्हाला डीवचू नये, आमच्या वाट्याला कोणी जाऊ नये, तसे झालेच तर मग लोकसभेसारखे चित्र होईल. मग पण पाडायचे अशी भूमिका आम्हाला घ्यावी लागेल. महायुती आणि महाआघाडीने याची काळजी घ्यावी, आम्ही यापुढे गनिमी काव्याने काम करू असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
जरांगे पाटलांना पाठिंबा : आनंदराज आंबेडकर
मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. त्यांच्या आंदोलनाला तसेच त्यांच्या भूमिकेला रिपब्लिकन सेनेचा पाठिंबा असेल, भविष्यात देखील आम्ही त्यांना सहकार्य करू, अशी प्रतिक्रिया प्रसिद्धी माध्यमांसोबत बोलताना आनंदराज आंबेडकर यांनी दिली.