शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देवळाली विधानसभा मतदारसंघांमध्ये तब्बल १८ इच्छुक उमेदवार आहे. मात्र अचानक बदललेल्या राजकीय घडामोडीमुळे राष्ट्रवादीने देवळालीच्या जागेवरील दावा सोडला असून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे योगेश घोलप यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता २०१९ प्रमाणे योगेश घोलप आणि सरोज अहिरे यांच्यात लढत होईल असे बोलले जात आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देवळाली विधानसभा मतदारसंघ आणि नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारी वाटपावरून काहीसा गोंधळात गोंधळ सुरू असल्याचे मागील काही दिवसांपासून दिसून येत आहे. देवळाली विधानसभा मतदार संघामधून सर्वाधिक इच्छुक असल्याने राष्ट्रवादीसाठी उमेदवारी निवडताना डोकेदुखी ठरत आहे. दुसऱ्या बाजूला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने या जागेसाठी दावा केला. मतदारसंघातील असंख्य समर्थकांनी ही जागा आपली पारंपरिक जागा असून त्यावर दावा करावा आणि माजी आमदार योगेश घोलप यांना उमेदवारी द्यावी,असे साकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना घातले. बुधवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत झालेल्या चर्चेत ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला सोडल्याचा दावा केला जात असून योगेश घोलप यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे घोलप यांच्या समर्थकांकडून सांगितले जात आहे. दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून देवळाली मतदारसंघाबाबत केलेल्या दाव्यात सत्यता कितपत आहे. यासाठी काही दिवस वाट पाहवी लागेल.
देवळालीच्या बदल्यात दोन जागा
देवळाली विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला सोडला. बदल्यात राष्ट्रवादीला शिवसेनेने दोन जागा दिल्याची चर्चा येथील राजकीय पटलावर केली जात आहे. देवळाली बाबतची चर्चा खरी की खोटी याचे उत्तर गुरुवारपर्यंत स्पष्ट होऊ शकते.