सिन्नर विधानसभा मतदार संघामधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्यास उदय सांगळे इच्छुक आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्यामुळे तीन ते चार दिवसापासून त्यांचा प्रवेश रखडला. दुसरीकडे भाजपचे माजी नगरसेवक गणेश गीते देखील नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघामधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. सांगळे आणि गीते यांच्यापैकी राष्ट्रवादी प्राधान्य क्रमाने कुणाला प्रथम प्रवेश देणार, याविषयी उत्सुकता होती. सोमवारी प्रवेशासाठी गीते यांचे नाव निश्चित झाले. पण मंगळवारी ( दि.२२ ) अचानक सांगळे यांचा प्रवेश झाला. परिणामी गीते यांचा प्रवेश रखडला असून उमेदवारीसाठी आता जगदीश गोडसे आणि अतुल मते यांच्या नावावर विचारमंथन सुरू झाले आहे.
सिन्नर विधानसभा मतदार संघामधून उदय सांगळे यांना उमेदवारी द्यावी की नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघामधून गणेश गीते यांना उमेदवारी द्यावी, असा पेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवड समिती समोर होता. त्यातच येवला विधानसभा मतदार संघामधून कुणाल दराडे यांच्याही नावाची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू होती. एकंदरीत बघितले तर सिन्नर, नाशिक पूर्व आणि येवला विधानसभा मतदारसंघात तीनही इच्छुक एकाच समाजाचे असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोर उमेदवारीसाठी पक्ष प्रवेश कुणाचा करावा अन् कुणाचा करू नये, याविषयी समस्या होती.
जातीय समीकरण साधण्यावर भर
सांगळे यांच्या समर्थकांकडून प्रवेश आम्हालाच मिळावा, यासाठी प्रयत्न केले जात होते. गीते यांच्या समर्थकांकडून देखील प्रवेश आपल्याला मिळावा, यासाठी प्रयत्न केले जात होते. दराडे यांच्या समर्थकांची भूमिका यापेक्षा वेगळी नव्हती. जातीय समीकरण बघितले तर कोणत्या तरी एका मतदार संघामध्ये मराठा समाजाचा उमेदवार देणे आवश्यक होते. तशी मागणी देखील पक्षांतर्गत केली जात होती.त्यामुळे सर्वांचेच प्रवेश रखडले. मंगळवारी ( दि. २२ ) अचानक सांगळे यांचा प्रवेश झाला. परिणामी गणेश गीते यांचा प्रवेश लांबणीवर पडला. त्यांच्या समर्थकांना माघारी फिरावे लागले.
गीते यांचा प्रवेश व्हेंटिलेटरवर ?
सांगळे यांच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गणेश गीते यांना प्रवेश देणार की नाही, याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. सांगळे यांच्याप्रमाणे गीते यांना प्रवेश देत नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघामधून उमेदवारी दिली,तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जातीय समीकरण बिघडू शकते. मराठा समाजामध्ये नाराजी निर्माण होऊ शकते. त्याचा परिणाम देवळाली, सिन्नर, येवल्यासह इतर विधानसभा मतदार संघावर देखील होऊ शकतो, अश्या शक्यतेमुळे गीते यांचा प्रवेश लांबणीवर पडलेला दिसतो. येत्या दोन ते तीन दिवसात गीते यांना खरोखर प्रवेश मिळणार की नाही, याविषयी स्पष्टता समोर येईल.
गोडसे अन् मते समर्थकांना दिलासा
गणेश गीते यांचा प्रवेश लांबणीवर पडला. यामुळे जगदीश गोडसे आणि अतुल मते यांच्या समर्थकांना मोठा दिलासा मिळाला. जगदीश गोडसे मागील दोन वर्षापासून विधानसभा मतदार संघात प्रचार करीत आहे. शरद पवार यांच्या भव्य जाहीर सभेचे यशस्वी आयोजन गोडसे यांनी केले होते. त्याचप्रमाणे अतुल मते यांनी देखील मतदारसंघात प्रचार सुरू केला. सामान्य नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. प्रचाराची यंत्रणा उभी केली. तरुणांच्या मदतीने मतदार संघात स्वतःचे नाव घराघरात पोचवण्याचे प्रयत्न केले. मते यांच्या नावाची वातावरण निर्मिती केली. गीते यांचा प्रवेश लांबणीवर पडल्यामुळे गोडसे आणि मते यांच्या समर्थकांना मोठा दिलासा मिळालेला दिसतो.