देवळाली विधानसभा मतदार संघावरील दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोडला असून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला ही जागा सोडली आहे. अशी चर्चा विरोधकांकडून जाणीवपूर्वक पसरवली जाते आहे. त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देवळाली विधानसभा अध्यक्ष अशोक पाळदे यांनी केले आहे.
देवळाली विधानसभा मतदारसंघामधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी सर्वाधिक इच्छुक आहे. त्यामुळे पक्ष संघटनेला देखील कुणाला संधी द्यावी, याविषयी द्विधा मनस्थिती असते. ज्यावेळेस पक्षाकडे अधिक इच्छुक असतात, अशावेळेस निर्णय घेणे अवघड बनते. देवळाली मतदारसंघात उमेदवारीसाठी राष्ट्रवादीकडे रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे निर्णय घेण्यास उशीर होत आहे. याचा गैरफायदा विरोधक घेत असून जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला सोडण्यात आल्याची अफवा पसरवली जाते आहे. राष्ट्रवादीने देवळालीचा दावा अद्याप सोडलेला नाही. मतदारसंघाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा आहे. वरिष्ठ जो निर्णय घेतील, तो सर्वांना मान्य असेल. देवळाली विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला सोडल्याची अधिकृत घोषणा राष्ट्रवादीने केलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचा मतदारसंघावरील दावा कायम आहे. असे अशोक पाळदे यांनी सांगितले.
निष्ठावंतांना संधी द्यावी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे देवळाली विधानसभा अध्यक्ष अशोक पाळदे यांनी देवळाली विधानसभा मतदार संघामधून निष्ठावंत कार्यकर्त्यास उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली असल्याचे सांगितले. आयत्या वेळेस पक्षात येणाऱ्या आयारामांना उमेदवारी देऊ नये, असे आम्ही वरिष्ठांना कळविले आहे. वरिष्ठ जो निर्णय घेतील, तो आम्हाला सर्वांना मान्य असेल.