नाशिक लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी रविवारी ( दि.१२ ) सकाळी देवळाली विधानसभा मतदार संघात प्रचार केला. त्यांच्यासोबत महाविकास आघाडी मधील घटक पक्षांचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते. लहवित गणा मधील बेलतगव्हाण,संसरी, शेगवे दारणा, नानेगाव , दोनवाडे, राहुरी, वंजारवाडी, लोहशिंगवे, लहवीत, शिंगवे बहुला, आणि देवळाली कॅम्प शहर या भागात प्रचार दौरा पार पडला. राजाभाऊ वाजे यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती जाणून घेतली.
त्यावर तोडगा कसा काढायचा याविषयी चर्चा करण्यात आली.प्रचारादरम्यान उपस्थित नागरिकांनी आपले म्हणणे ,अडचणी राजाभाऊ वाजे यांच्यासमोर मांडल्या. मतदार संघात वर्षानुवर्ष भेडसावत असलेल्या कायमस्वरूपीच्या समस्या वाजे यांच्या निदर्शांस आणून देण्यात आल्या. गावातील मारुती मंदिर, समाज मंदिर तसेच चौका – चौकात वाजे यांनी नागरिकांसोबत संपर्क साधत मतदान करण्याचे आवाहन केले.
यावेळी महिलांनी ठिकठिकाणी राजाभाऊ वाजे यांचे औक्षण केले. दौऱ्याप्रसंगी देवळाली विधानसभा मतदारसंघातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाजे यांना आघाडी मिळवून देऊ : रतन चावला
देवळाली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांना निश्चितपणे आघाडी मिळेल. येथील त्रस्त झालेला शेतकरी, कामगार तसेच मध्यमवर्गीय जनता वाजे यांच्या पाठीमागे उभी राहील. देवळाली मतदारसंघात असलेल्या समस्या सोडविण्याची क्षमता वाजे यांच्या नेतृत्वात आहे. मतदार त्यांना निश्चितपणे विजयी करतील यात तिळमात्र शंका नाही.