उषःकाल होता होता काळरात्र झाली…, अरे आयुष्याच्या पुन्हा पेटवा मशाली… या गीताच्या कडव्यामुळे गोडसे समर्थकांच्या मनात धास्ती ?
नाशिक लोकसभा मतदार संघातील महायुतीची अधिकृत उमेदवारी खासदार हेमंत गोडसे यांना जाहीर झाली. लगेच भुजबळ समर्थकांनी लता मंगेशकर यांच्या प्रसिद्ध मराठी गीताचे एक कडवे सोशल मीडियावर टाकत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ते कडवे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड प्रसिद्ध झालेले आहे. भुजबळ ब्रिगेडने शोधलेल्या कडव्याचा उपयोग अखंड महाराष्ट्र भर सुरू झाला. या प्रसिद्धीचे खरे श्रेय भुजबळ ब्रिगेडलाच द्यावे लागेल. उषःकाल होता होता काळरात्र झाली…, अरे आयुष्याच्या पुन्हा पेटवा मशाली…, हेच ते कडवे आहे. या कडव्यामुळे गोडसे समर्थकांची प्रचारा दरम्यान चांगलीच दमछाक झालेली दिसते. कडव्याचा राजकिय पडद्यामागचा अर्थ हा खूप काही सांगून जातो. महायुतीची अधिकृत उमेदवारी हेमंत गोडसे यांना मिळाल्याने भुजबळ समर्थकांची नाराजी लपून राहिलेली नाही.
यापूर्वी झालेल्या २०१४ , २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गोडसे यांनी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांचा पराभव केल्याचे शल्य देखील भुजबळ ब्रिगेडच्या मनात असणार आहे. सध्या २०२४ मधील लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोरात आहे. मागील दोन निवडणुकीचे राजकीय गणित हे गोडसे यांना अनुकूल होते. या वेळेला मात्र म्हणजेच २०२४ च्या निवडणुकीचे राजकीय गणित गोडसे यांना काहीसे त्रासदायक वाटते आहे.
२०१४ आणि २०२९ मध्ये भुजबळ कुटुंबाला पराभवाची धूळ चारणाऱ्या हेमंत गोडसे यांना २०२४ च्या निवडणुकीत धडा शिकवण्याची हीच ती योग्य वेळ अन संधी निर्माण झालेली आहे. संधीचे सोने करून हिशोब बरोबर म्हणजे चुकता करावा, असा सरळ अर्थ राजकीय जाणकार भुजबळ ब्रिगेडने शोधलेल्या कडव्याचा काढतांना दिसतात. उषःकाल होता होता काळरात्र झाली…, अरे आयुष्याच्या पुन्हा पेटवा मशाली…, या वाक्याचा अर्थ म्हणजे २०१४ ,२०१९ निवडणुकीत भुजबळांच्या झालेल्या पराभवाची परतफेड करण्याची मोठी संधी २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत असून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांची निशाणी असलेली मशाल हाती घेऊन त्यांना निवडून आणून २०१४ + २०१९ ची परतफेड करून हिशोब २०२४ मध्ये = बरोबर करा,असा सोशल मीडिया वरील व्हायरल पोस्टचा अर्थ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जाते आहे.
भुजबळ ब्रिगेड ने दिलेला संदेश प्रत्यक्षात खरा की खोटा किंवा यात कितपत तथ्य असणार आहे, यासाठी दि.४ जुन रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी पर्यंत वाट पहावी लागेल. तोपर्यंत मात्र भुजबळ ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गोडसे समर्थकांच्या मनात चलबिचल सुरू करून दिली आहे. भुजबळ ब्रिगेड निवडणुकीत आपल्याला मदत करणार की नाही, किंव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या मशालीचे चिन्ह खरोखरच हाती घेणार का,असा प्रश्न गोडसे समर्थकांना सतावतो आहे.