654 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
देवळाली विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडी मधील वाटाघाटीत कोणत्या पक्षाला मतदारसंघ सुटतो, त्यावर माजी आमदार योगेश घोलप यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. कधी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला म्हणजेच तुतारी ला , तर कधी मशाल चिन्ह असणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला जागा सुटेल, अशी चर्चा होताना दिसते. जोपर्यंत जागावाटप निश्चित होत नाही, तोपर्यंत घोलप यांचे राजकीय भवितव्य अधांतरीत असल्याचे बोलले जात आहे.
देवळाली विधानसभा मतदारसंघ सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटेल असे निश्चित मानले जात आहे. परंतु काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला ही जागा सुटेल अशी देखील चर्चा रंगत आहे. त्यामुळे निश्चित जागा कोणत्या पक्षाला सुटेल, याविषयी सध्या तरी सांगणे अवघड वाटते. एकंदरीत राजकीय वातावरण बघितले तर ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटेल असा बहुतांश राजकीय विश्लेषकांचा दावा आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तब्बल अठरा इच्छुकानी उमेदवारीसाठी दावा केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून माजी आमदार घोलप यांचे नाव सर्वात पुढे असून अग्रक्रमाने घेतले जाते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा सुटणार असेल तर माजी आमदार योगेश घोलप यांच्या राजकीय भवितव्याविषयी काय होणार , याची चर्चा राजकीय पटलावर रंगलेली दिसते.
तर घोलप यांच्या भूमिकेकडे लक्ष ?
माजी आमदार योगेश घोलप यांनी १७ सप्टेंबर २०२३ रोजी मुंबई येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विद्यमान जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी यांच्या मध्यस्तीने शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना घोलप यांनी शरद पवार महविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आहे. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी भेट घेतली.अशी प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादीला जागा सुटली तर तुम्ही राष्ट्रवादी कडून निवडणूक लढवणार का, यावर उत्तर देताना घोलप यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगतील तीच पूर्व दिशा, अशी प्रतिक्रिया दिली. थोडक्यात जागा राष्ट्रवादीला सुटली तर घोलप राष्ट्रवादीकडून देखील निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे बोलले जाते.
माजी मंत्री घोलप अन् शरद पवार भेटीची चर्चा
माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. त्यांनी शुक्रवारी ( दि. १८ ) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शरद पवार यांची भेट घेतली. भेटीत पुत्र योगेश घोलप यांच्या उमेदवारीसाठी साकडे घातल्याची चर्चा झाल्याचे कळते. त्यामुळे मागील काही दिवसांपासून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली दिसते. घोलप यांना उमेदवारी दिली तर राष्ट्रवादीच्या अठरा इच्छुकांची भूमिका काय असणार ?, हे महत्वाचे आहे.
राष्ट्रवादीत गोंधळात गोंधळ ; लक्ष्मण मंडाले यांचे नाव आघाडीवर
देवळाली मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. तब्बल १८ इच्छुक उमेदवारीसाठी प्रयत्नशील दिसतात. शुक्रवारी ( दि. १८ ) योगेश घोलप यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यामुळे राजकारणात मुरब्बी असलेले शरद पवार नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. उमेदवारी वरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उलट – सुलट चर्चा सुरू दिसते. पक्षात निष्ठावंत असणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी मिळावी, असा एक मतप्रवाह आहे. यात मागच्या वेळेला डावलले गेलेले लक्ष्मण मंडाले यांचे नाव पुढे असून त्यांनाच निश्चितपणे उमेदवारी मिळेल, असा दावा, समर्थकांचा आहे.