इगतपुरी : विक्रम पासलकर
नाशिक शिक्षक मतदार संघात येत्या २६ जुन रोजी होणाऱ्या निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. संदीप गोपाळराव गुळवे यांना विविध शिक्षक संघटना यांचा पाठिंबा मिळतो आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा देखील पाठिंबा असल्याची चर्चा आहे. त्यातच आता माजी आमदार निर्मला गावित यांच्या पाठिंब्याची भर पडलेली आहे. त्यामुळे गुळवे समर्थकांमध्ये उत्साह आहे.
माजी आमदार निर्मला गावित गुळवे यांच्या विजयासाठी मैदानात उतरल्या आहेत. त्यामुळे निवडणूकीत चुरस निर्माण होताना दिसते. मंगळवारी गावित यांनी नाशिक शिक्षक मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. संदीप गोपाळराव गुळवे यांच्या प्रचारार्थ साक्री तालुक्यातील पिंपळनेर,साक्री, कासारे, मालपुर, सामोरे या परिसरात प्रचार केला.
त्यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इगतपुरी विधानसभा प्रमुख कचरू पाटील डुकरे, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता रमेश गावित, संदीप जाधव यांनी माजी खासदार बापूसाहेब चौरे व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते उत्तम बापू देसले, शरद भाऊ शिंदे, अनिल भाऊ शिंदे आदी. संस्थाचालक व मान्यवरांचा समावेश होता. यावेळी इगतपुरी तालुक्याचे भूमिपुत्र संदीप गोपाळराव गुळवे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. दरम्यान ठिकठिकाणी शिक्षक तसेच महिला शिक्षकांनी आपण ॲड. गुळवे यांच्यासोबत असल्याची ग्वाही दिली.
त्यांना पहिल्या पसंतीचे मत मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले. इगतपुरी तालुक्यातील गुळवे समर्थक संदीप गोपाळराव गुळवे यांच्या विजयासाठी दिवसरात्र कष्ट घेत आहे. उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यात समर्थक प्राचारासाठी गेले आहेत. इगतपुरी तालुक्याला गुळवे यांच्या रूपाने आमदारकी मिळणार या एका विश्वासाने सर्वपक्षीय कार्यकर्ते,नेते कामाला लागलेले दिसून येत आहे.