नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी आज ( दि. ७ ) शेवटचा दिवस होता. त्यामुळे नाशिकरोड येथील विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात अर्ज भरण्यासाठी इच्छूक उमेदवार अन कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. शिक्षक मतदार संघाचे विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या नावाने एका इच्छुकाने अर्ज भरला. त्याची माहिती आमदार किशोर दराडे यांच्या समर्थकांना समजली.त्यांनी किशोर दराडे नावाने अर्ज भरणाऱ्या इच्छुकावर मारहाण करीत शिवीगाळ केली.याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
अचानक घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे .किशोर दराडे नावाच्या इच्छुकाला मारहाण सुरू असताना येथील उपस्थित पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला.
मारहाण करणाऱ्या व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले.कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी तातडीने उपाययोजना केली.पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. यावेळी मारहाण करणाऱ्या व्यक्तींना नाशिक रोड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
दोनही गटाकडून घोषणाबाजी विद्यमान आमदार किशोर दराडे हे शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची चर्चा आहे. त्याचप्रमाणे एड.संदीप गुळवे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उबाठाने त्यांना उमेदवारी देखील दिलेली आहे. आज शेवटच्या दिवशी दोनही उमेदवार अर्ज भरण्यासाठी आले. त्यामुळे त्यांच्या समर्थकांची गर्दी देखील मोठ्या संख्येने होती. यावेळी दोन्ही गटांमध्ये घोषणाबाजी पाहायला मिळाली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच किशोर दराडे नावाने अर्ज भरणाऱ्या एका इच्छुकाला धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे येथील वातावरण तणावग्रस्त बनले होते.