- नाशिक लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांनी बुधवारी ( दि.५ ) मुंबई येथील मातोश्री येथे जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत पुढील कार्यासाठी आशीर्वाद घेतले. याप्रसंगी उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाला ठाकरे यांनी आता खासदारकीत विजय मिळवला, त्याबद्दल तुमचे अभिनंदन. परंतु पुढची विधानसभा आणि महापालिकेवर देखील आपल्याला भगवा फडकवायचा आहे. त्यादृष्टीने आपण तयारीला लागा, अशी सूचना त्यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना केली.
नाशिक लोकसभा मतदारसंघात दोन वेळेला निवडून आलेले खासदार हेमंत गोडसे यांचा राजाभाऊ वाजे यांनी प्रचंड मतांनी पराभव केला. राजाभाऊ वाजे विजयी झाल्यानंतर त्यांनी सर्वात प्रथम मुंबई येथे जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांसोबत भेट घेतली. यावेळी ठाकरे यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या. तसेच नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांचे अभिनंदन केले. त्यांच्या पुढील राजकीय ,सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने,एक दिलाने काम केल्याने त्यांचे कौतुक ठाकरे यांनी केले. त्याचबरोबर पुढील काळात येणाऱ्या विधानसभा, महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये सर्वांनी लोकसभेप्रमाणेच एकदिलाने काम करावे, अशी सूचना ठाकरे यांनी केली उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केली.आपल्या सूचनेचे तंतोतंत पालन केले जाईल, असे वचन पक्षप्रमुख ठाकरे यांना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी प्रचंड उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण दिसून आले.
याप्रसंगी माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड,वसंत गीते ,विनायक पांडे ,जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर , उपजिल्हाप्रमुख केशव पोरजे, विलास शिंदे, डी. जी.सूर्यवंशी, भरत कोकाटे, बाळासाहेब वाघ, पिराजी वाघ ,माजी नगरसेवक प्रशांत दिवे, रोशन आढाव आदी उपस्थित होते.