2,722 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
व्यायाम करून दुचाकीने मळे वसाहती मधील आपल्या घरी परतत असलेल्या दोन युवकांवर मक्याच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. हल्ल्यात एका युवकाला किरकोळ दुखापत झाली. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमाराला आडगाव शिवारातील सात नंबर चारीजवळ घटना घडली. हल्ल्यात जखमी झालेल्या युवकांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ऋषी देशमुख ( वय २० ), सचिन देशमुख ( वय १९ ) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकांची नावे आहेत. दोघेही गावातून निवास्थानकडे परतत होते. येथील शिंदे वस्तीजवळच्या रस्त्यावर आल्यानंतर बिबट्याने अचानक हल्ला केला. यावेळी ऋषी दुचाकीवर पाठीमागे बसलेला होता. त्याच्या पायाला किरकोळ दुखापत झाली.अचानक झालेल्या हल्ल्यामुळे दोघांनाही घाबरून आरडा ओरडा केला. आरडा ओरडा झाल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेतली. नागरिकांची गर्दी होतच बिबट्याने पळ काढला. दरम्यान बिबट्याच्या हल्ल्याची घटना समाजात मळे शिवारात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने पिंजऱ्याची व्यवस्था करावी.अशी मागणी त्रस्त नागरिकांकडून केली जात आहे.
पिंजरा उभारा, पथदीप बसवा !
आडगाव शिवारात बिबट्याचा संचार कायम आहे. वर्षभर येथीलं नागरिक दहशतींमध्ये असतात. शेती पिके, आजबाजूला दाट झाडे आणि झुडपे वाढलेली आहे. त्यामुळे बिबट्याला लपण्यासाठी पोषक वातावरण आहे. वन विभागाने येथे कायमस्वरुपी पिंजऱ्याची व्यवस्था करावी. तसेच महानगर पालिकेने येथील मळे वसाहतीमध्ये पथदीप उभारावेत. अशी रास्त मागणी यानिमित्ताने केली जाते आहे.



