23.5 C
Nashik
Monday, June 29, 2026
spot_img

कुंभमेळ्यात अखंडित वीज सेवेसाठी महावितरण सरसावले ! ; संचालक धनंजय औंढेकर यांच्याकडून उपाययोजनांचा आढावा

39 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख 

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक नगरीत येणाऱ्या कोट्यवधी भाविकांना आणि स्थानिक नागरिकांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय २४ तास अखंडित, सुरक्षित आणि उच्च दर्जाचा विद्युत पुरवठा करण्यासाठी महावितरण कार्यरत असून या भव्य सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्युत वितरणाच्या पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण आणि सूक्ष्म नियोजनासाठी महावितरणचे संचालक (संचलन) धनंजय औंढेकर यांनी शुक्रवारी विद्युत भवन येथे आढावा बैठक घेतली आणि आज शनिवारी भद्रकाली येथे विद्युत उपकेंद्राच्या तसेच इतर कामाची पाहणी केली. 

कुंभमेळा काळात ‘अखंडित वीज पुरवठा’ राखण्याचे उद्दिष्ट ठेवून सर्व विकास कामे गुणवत्तापूर्ण, तातडीने आणि कालबद्ध मर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यावेळी नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांची उपस्थिती होती. कुंभमेळ्यासारख्या जागतिक दर्जाच्या सोहळ्यात वीज सेवा अखंडित ठेवणे ही महावितरणची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगत संचालक औंढेकर यांनी प्रत्येक स्तरावर जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश दिले. वीज पुरवठ्यात अचानक तांत्रिक बिघाड झाल्यास तात्काळ पूर्ववत करण्यासाठी सक्षम अत्याधुनिक पर्यायी यंत्रणा सज्ज ठेवली जाणार आहे.

येथे होतेय उपकेंद्रांची उभारणी 

विद्युत यंत्रणा सक्षम करण्यासाठी गोदापार्क, भद्रकाली, नांदूर-मानूर आणि तळवाडे येथे नवीन ३३/११ केव्ही क्षमतेची अत्याधुनिक विद्युत उपकेंद्रे उभारण्यात येत असून, सर्व कामांमध्ये गुणवत्ता व गतिमानता राखली जाणार आहे. या संपूर्ण परिसरातील वीज पुरवठ्यावर देखरेख ठेवण्यासाठी २४x७ विशेष नियंत्रण कक्ष आणि फिरते दुरुस्ती पथक कार्यरत केले जाणार आहे.ऐन गर्दीच्या काळात आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी आवश्यक असलेले अतिरिक्त मनुष्यबळ आणि तांत्रिक साहित्य तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

दरम्यान संचालक धनंजय औंढेकर यांनी नाशिक शहरातील भद्रकाली विद्युत उपकेंद्र, शाहीमार्ग व रामकुंड येथे भेट देत सुरू असलेल्या विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी उपस्थित अभियंत्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले. या दौऱ्यात आणि बैठकीत अधीक्षक अभियंते देवेंद्र सायनेकर, अनिल थोरात, जगदीश इंगळे व रमेशकुमार पवार, तसेच कार्यकारी अभियंते योगेश निकम, नंदकिशोर काळे, चेतन वाडे, जगदीश जाधव व गोपाल पाटील यांच्यासह महावितरणचे इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles