महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना नाशिकरोड व परिसरामधून मोठ्या मताधिक्याने आघाडी मिळवून देऊ, अशी माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख केशव पोरजे यांनी दिली.
याविषयी बोलतांना उपजिल्हाप्रमुख केशव पोरजे म्हणाले की, मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी आम्ही घरोघरी फिरत आहोत. प्रचारदौऱ्या दरम्यान नागरिकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता राजाभाऊ वाजे हे निश्चितपणे खासदार होतील, यात तिळमात्र शंका वाटत नाही. मोठ्या मताधिक्याने खासदार म्हणून वाजे निवडून येणार असल्याचे सद्याचे चित्र आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातील जनता राजाभाऊ वाजे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असल्याचे ठिकठिकाणी आम्हाला निदर्शनास येत आहे.
जनतेमधून मिळणारा वाढता प्रतिसाद आणि व्यक्तिगत राजाभाऊ वाजे यांचे नम्र व प्रामाणिक व्यक्तिमत्व, यामुळे नाशिक लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत केवळ औपचारिकता उरली आहे. ( दि. ४ ) जून रोजी राजाभाऊ वाजे यांच्या खासदार पदावर शिक्कामोर्त होईल, असे शिवसेना उपजिल्हाप्रमुख केशव पोरजे यांनी सांगितले.