सद्या राज्यभर उष्णतेची तीव्र लाट निर्माण झालेली दिसत आहे. धरणातील पाणीसाठा बाष्पीभनामुळे घटत चालला आहे.नाशिक शहर देखील त्याला अपवाद नाही.परिणामी पाणी कपात आणि पाणी टंचाईचा सामना शहरातील काही भागातील सामान्य जनतेला करावा लागतो आहे.नाशिकरोड व जेलरोड परिसरातील प्रभाग १७ मधील काही भागात सद्या कमी दाबाने पाणी पुरवठा,पाणी टंचाईची समस्या स्थानिक नागरिकांना भेडसावताना दिसते. या समस्यांनी त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी सामाजिक कर्तव्य म्हणून मोफत पिण्याच्या पाण्याचा टँकर पुरविण्याचा उपक्रम सौ.प्रमिला कैलास मैंद यांनी राबविला आहे.यामुळे त्रस्त नागरिकांना उष्णतेच्या दाहकतेत माणुसकीचा झरा!, असा अनुभव येताना दिसतोय.
एकेकाळी थंड हवेचे ठिकाण म्हणून नाशिक शहराची ओळख होती.पर्यावरण समतोल,वाढत्या जागतिक तापमानामुळे जगभर उष्णतेची दाहकता अनुभवायला येते आहे. या समस्यावर मात करण्यासाठी किंवा नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वच देशातील सरकारे प्रयत्नशील दिसतात. पण प्रत्यक्षात दरवर्षी कमालीचे तापमान वाढतच आहे. त्यातच शहराचा वाढता विस्तार,कमी पर्जन्यमान यामुळे मार्च,एप्रिल महिन्यातच पाणी टंचाईच्या झळा नाशिककराना सोसाव्या लागत आहे. त्यावर उपाय म्हणून शासनाची मोफत पिण्याच्या पाण्याची टँकरची योजना आहे. परंतु सर्वच टंचाईग्रस्त भागात योजनेची शंभर टक्के अंमलबजावणी होईल याविषयी शाश्वती नसते. त्यावर तोडगा म्हणुन येथील सौ.प्रमिला मैंद यांच्याकडून दररोज सुमारे २० ते २२ मोफत पिण्याच्या पाण्याचे टँकर गरजु नागरिकांना पुरविण्यात येत आहे. साधारण चाळीस दिवसांपासून उपक्रम राबविण्यात येत आहे. आजच्या घडीला एक हजाराच्या आसपास मोफत टँकर पुरविण्यात आलेले आहेत.
“टँकर आपल्या दारी”
प्रभाग १७ मधील काही भागात सद्या पाणी टंचाई भेडसावत आहे. सौ.प्रमिला कैलास मैंद यांच्याकडून दररोज पिण्याच्या पाण्याचे मोफत टँकर नागरिकांना घरोघरी पोहचवले जात आहे. टँकर आपल्या दारी असा उपक्रम मैंद कुटुंबियांनी सुरू केला आहे. सातशे लिटर पिण्याच्या पाण्याची क्षमता असणारे टँकर नागरिकांसाठी पुरविले जात आहे. टँकर आपल्या दारी योजना प्रत्यक्षात अंमलात उतरविण्यासाठी दररोज हजारो रुपयांचा खर्च प्रमिला मैंद यांना येतो आहे. टँकरचे भाडे, टँकर चालक, आणि एक मदतनीस असा लवाजमा दररोज एकत्रित करावा लागतो. शिवाय पिण्याच्या पाण्याची मागणी आल्यावर तत्काळ अन् वेळेत पाणी टँकर उपलब्ध करून तो पोहच करावा लागतो. मागील एक ते दिड महिन्यापासून मोफत पिण्याच्या पाण्याचा उपक्रम राबविला जात असल्याने सौ.प्रमिला कैलास मेंद यांच्याकडे जलदूत म्हणून पाहिले जाते आहे. जलदूत म्हणून त्यांची ओळख निर्माण होऊ पाहत आहे.
संघटित महिलांची शक्ती उभारणार : सौ.प्रमिला मैंद
आजच्या गृहणी समोर पिण्याच्या पाण्याची टंचाई ही एकमेव समस्या नाही.त्यांच्यासमोर अनेक समस्या आहेत. जेल रोडला अधिकृत भाजी बाजार नाही, बच्चे कंपनीसाठी सर्व सुविधांनी परिपूर्ण उद्याने दिसत नाही.आहेत त्यांची कमालीची दुर्दशा झालेली दिसते. पथदीप केंव्हा बंद असतात अन् केंव्हा सुरू असतात तेच समजत नाही. कॉलनी रस्त्यांची अक्षरशः वाट लागलेली दिसते. महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. अधिकारी सामान्य जनतेची समस्या जाणून घेत नाही. समस्या सोडविण्यासाठी विभागीय कार्यालयात सतत चकरा माराव्या लागतात. समस्या मार्गी लावण्यासाठी महिलांनी संघटित होणे आवश्यक आहे. संघटनाच्या माध्यमातून महिलांची शक्ती उभी करण्याचा माझा मानस आहे.