जेलरोड परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याच्या नूतनीकरणाचे काम मागील दीड वर्षापासून सुरू आहे. यासाठी महापालिकेने दोन कोटी रुपये खर्च मंजूर केलेला आहे. अपेक्षेपेक्षा जास्त कालावधीन उलटून देखील नूतनीकरणाचे काम अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे शिवप्रेमी जनतेमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण दिसून येत आहे. याप्रश्नी आमदार अँड राहुल ढिकले यांनी मध्यस्थी करावी, संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना यंदाच्या शिवजन्मोत्सवापूर्वी नूतनीकरणाचे काम पूर्ण करण्यास भाग पाडावे अशी रास्त मागणी केली जात आहे.
नाशिक शहराचे तत्कालीन माजी महापौर शांताराम बापू वावरे, जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष गोपाळराव गुळवे, तत्कालीन उपमहापौर रंजना बोराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच माजी नगरसेवक स्व. प्रकाश बोराडे यांच्या प्रयत्नाने जेलरोड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण झाले. या सोहळ्याला साधारण वीस वर्षे पूर्ण झालेली आहे. त्यामुळे येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याच्या नूतनीकरण व सुशोभीकरणाचा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्याची दखल स्थानिक लोकप्रतिनिधीनी घेतली. त्यांनी पाठपुरावा करून सातत्याने आवाज उठविल्यामुळे महापालिकेने सुमारे दोन कोटी रुपयांच्या सुशोभीकरण व नूतनीकरणाला मंजुरी दिली. आजच्या घडीला या कामाचे उद्घाटन होऊन जवळपास दीड वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहे. एवढा कालावधी उलटून देखील अद्याप पावेतो नूतनीकरणाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्याची खंत येथील शिवप्रेमी जनतेला आहे.वास्तविक पाहिले गेले तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या नूतनीकरणाच्या कामाला विलंब होण्यास फारसे गंभीर कारण दिसत नाही.
या कारणांमुळे होतो विलंब
याप्रश्नी महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार उदासीन असल्याचा आरोप जनतेतून केला जातो आहे. त्यामुळे नूतनीकरणाचे काम रेंगाळलेले दिसते.अगदी कासवाच्या गतीने काम सुरू असल्याचे बोलले जात आहे. परंतु जुने दगडाचे कोरीव आणि नक्षीकाम आहे. शिवाय बारीक-सारीक कलाकुसरीचे काम देखील करावी लागते. या कारणांमुळे नूतनीकरण आणि सुशोभीकरणाच्या कामाला विलंब होत असल्याचा दावा महापालिकेच्या अधिकारी वर्गाकडून होतांना दिसतो.
संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारणार : गाडेकर – भोजने
जेलरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या नूतनीकरण व सुशोभीकरणास विलंब होतो आहे. याविषयी बोलताना नाशिक रोड शिवजन्मोत्सव समिती : २०२५ चे अध्यक्ष योगेश गाडेकर आणि जेलरोड शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सागर भोजने यांनी याप्रश्नी आम्ही महापालिकेचे संबंधित अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून त्यांना विलंबाचा जाब विचारणार आहोत. कासव गतीने सुरू असलेल्या कामाविषयी आम्ही चर्चा करून लवकरात लवकर काम पूर्ण करण्यास भाग पाडू, असं स्वरूपाची संयुक्तिक प्रतिक्रिया दिली.