ज्युनिअर चेंबर्स इंटरनॅशनल या व्यक्तिमत्व विकास संस्थेतर्फे मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या पंचविस विद्यार्थ्यांना पंच्याहत्तर हजार रुपयांची शिष्यृवृत्ती थेट खात्यात वर्ग करण्यात आली. मविप्रचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते व जेसीआय संस्थेचे पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थित शिष्यवृत्ती वाटप केली. जेसीआय संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष रिकेश शर्मा व महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष प्रतिक सारडा यांच्या मार्गदर्शनाने सन २०२४ या वर्षासाठी शिष्यवृत्तीचे वाटप झाले.
ज्युनिअर चेंबर्स इंटरनॅशनल अर्थात जेसीआय संस्था विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकरीता सतत अग्रेसर व प्रयन्तशील असते. जेसीआय नाशिकरोड शाखेच्या वतीने राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या विद्यार्थ्याना डीबीटी म्हणजेचे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती वर्ग करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मविप्र संस्थेच्या नाशिक येथील मध्यवर्ती कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मविप्रचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांनी जेसीआय संस्थेने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्याबददल आभार व्यक्त केले. याप्रंसगी देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयाच्या प्रचार्या डॉ. प्रतिमा पंडीत वाघ, मराठा हायस्कूलचे उपप्राचार्य आर.एस. उगले तसेच के. पी. शिंदे उपस्थित होते. जेसीआयचे वरिष्ठ पदाधिकारी भरत निमसे, प्रतिक पिंगळे, नाशिकरोड जेसीआय अध्यक्ष मोहन सानप यांनी मविप्र संस्थेच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी प्रयन्त केले.