प्रवेशामुळे काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
राष्ट्रीय काँग्रेसचे माजी नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी रविवारी ( दि.१२ ) भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश झाला.त्यांच्या प्रवेशामुळे धुळे लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. त्याचप्रमाणे धुळे लोकसभा मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या अडचणीत यामुळे भर पडू शकते. धुळे लोकसभा मतदारसंघातून डॉ. तुषार शेवाळे हे काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली होती. त्यांच्या ऐवजी डॉ. शोभा बच्छाव यांना कॉंग्रेस पक्षाने उमेदवारी दिली.
त्यामुळे डॉ. शेवाळे यांचे समर्थक नाराज झाले होते. डॉ.शेवाळे यांनी मागील काही दिवसांपासून धुळे लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचार देखील सुरू केला होता. उमेदवारी निश्चितपणे आपल्याला मिळेल असे त्यांनी गृहीत धरले होते. पण प्रत्यक्षात डॉ. शेवाळे यांना टाळून डॉ. बच्छाव यांनी उमेदवारी मिळाली. यामुळे संतप्त झालेल्या शेवाळे समर्थकांनी काँग्रेसला धडा शिकवण्यासाठी डॉ. शेवाळे यांना भाजपमध्ये प्रवेश करण्यास भाग पाडल्याचे बोलले जात आहे. डॉ. तुषार शेवाळे यांच्या प्रवेशाने भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांना लाभ होणार की नाही ? या प्रश्नाचे उत्तर हे मतमोजणी नंतर स्पष्ट होईल.