महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष खंडेराव मेढे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचित कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना राज्यातील कृषी विद्यापीठ,महाविद्यालये आणि कृषी संशोधन केंद्राची पाहणी करून त्यात सुधारणा करावी, अशा स्वरूपाचे निवेदन देण्यात आले होते. त्याची तातडीने दखल घेत नामदार कोकाटे यांनी मालेगाव येथील आष्टी कृषी महाविद्यालय संकुलनाची पाहणी केली. सोबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होता.
शासनाने राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांना ऊर्जितावस्थेत आणावे, यासाठी कृषी विभागात नवे धोरण राबवावे. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी असलेले निवेदन मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष खंडेराव मेढे यांनी नवनिर्वाचित कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दिले होते. यावेळी झालेल्या चर्चेत शेतकरी आत्महत्या विषयावर चर्चा करण्यात आली. त्यात कृषी मंत्रालय व त्या अंतर्गत येणाऱ्या विविध संस्था, विद्यापीठे यांची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे.शेतकरी अवघ्या पाच हजार रुपयांच्या कर्जापोटी आत्महत्या करीत आहे.महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची मालिकाच सुरूच असल्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निदर्शनास मनसेच्या उपाध्यक्ष खंडेराव मेढे यांनी निदर्शनास आणून दिले होते. त्याची दखल घेत ना. कोकाटे यांनी मालेगाव आष्टी येथील कृषी महाविद्यालय संकलनाची पाहणी केली आहे.
निवेदातील आशय थोडक्यात असा
सोयाबीन, कापूस, ज्वारी, बाजरी, भात शेतीची अवस्था अतिशय बिकट आहे. यासाठी हमीभाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने केलेली आहेत. शेतकऱ्याच्या भाजीपाल्यालाही योग्य भाव मिळत नाही म्हणून शेतकरी हवालदिल आहे. अशा परिस्थितीत आपण कृषिमंत्री पदाचा काटेरी मुकुट डोक्यावर घातलेला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव, आधुनिक शेती, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील आणि यशस्वी कृषिमंत्री व्हायचे असेल, तर महाराष्ट्रातील सर्व कृषी विद्यापीठांना ऊर्जितावस्थेत आणून त्यातून पदवी घेऊन उत्तीर्ण झालेल्या शेतकऱ्याला आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देणे गरजेचे आहे, असेही निवेदनात म्हटले होते.