राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्याने नाराज झालेल्या माजी मंत्री छगन भुजबळ यांनी अखेर आपले मौन सोडले. सोमवारी ( दि.१६ ) नागपूर येथे प्रसिद्धी माध्यमांसोबत बोलताना त्यांनी आपले मन मोकळे केले. मंत्रिपद मिळाले नाही, या प्रश्नावर बोलतांना मला डावलले गेले, होय मी नाराज आहे. असे स्पष्ट उत्तर दिले. पक्षश्रेष्ठींनी मला राज्यसभेची ऑफर दिली. पण मी येवला विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा देणार नाही. आणि राज्यसभेवर देखील जाणार नाही. राजीनामा दिला तर माझ्या मतदारसंघातील जनतेसोबत प्रतारणा केल्यासारखे होईल. नाशिक येथे मंगळवारी ( दि.१७ ) समता परिषद आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करेल. असे भुजबळ यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सुनील तटकरे अजितदादा पवार यांनी मला तुम्हाला लोकसभेची निवडणूक लढवावी लागेल, पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांची तशी इच्छा आहे,असे सांगितले. त्यामुळे मी नाशिक लोकसभा मतदारसंघांमधून निवडणुकीच्या तयारीसाठी लागलो. तयारी देखील पूर्ण केली. वेळेवर उमेदवारी नाही. माझी मेहनत, कष्ट वाया गेले.चार ते पाच महिन्यापूर्वी राज्यसभेवर मला पाठविले जाईल, असे सांगितले. त्यावेळेस माझी इच्छा देखील होती. परंतु त्यावेळेला साताऱ्याचे नितीन पाटील यांना मी शब्द दिला आहे.असे अजित दादा पवार यांनी सांगितले. त्यामुळे सध्या तरी तुम्हाला राज्यसभेवर पाठविणार नाही.
मला लहान मुलगा समजले काय
तुम्ही विधानसभेचीच निवडणूक लढवा,तुमची गरज पक्षाला आहे. असे सांगितले. त्यावेळेस मी थांबलो. विधानसभा निवडणुकीत माझा विजय झाला. मला ज्येष्ठ असल्याने मंत्रीपद मिळेल, अशी अपेक्षा होती. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तुम्हाला राज्यसभेवर पाठवायचे आहे. नितीन पाटील राजीनामा देतील, तुम्हाला मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार नाही. तुमची गरज राज्यसभेत आहे. असे पुन्हा एकदा सांगितले. त्यास मी स्पष्टपणे नकार दिला. मला मंत्रिमंडळात स्थान हवे, अशी माझी स्पष्ट भूमिका होती. पक्षाचे पदाधिकारी मला खेळवत राहिले, मला लहान मुले समजतात काय, अशी स्पष्ट प्रतिक्रिया भुजबळ यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर दिली.
जरांगे वरील टीकेचे बक्षीस !
मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळाले नाही, आपल्याला डावलेले गेले, यामागे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलेली टीका हे कारण आहे का ?, या प्रश्नाला उत्तर देताना कदाचित हे कारण राहू शकते. असे उत्तर दिले.
उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या विरोधात आंदोलन !
भुजबळ यांना मंत्री मंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील येवला,लासलगाव, नाशिक शहर आणि अहिल्यानगर येथे भुजबळांच्या समर्थकांनी आंदोलन केले. भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे,अशी मागणी आंदोलकांनी केली. यादरम्यान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन देखील छेडण्यात आले. याप्रसंगी येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष वसंतराव पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष दीपक लोणारी, माजी नगरसेवक अमजद शेख, मलिक शेख, मतीन अन्सारी, महेश गादेकर, विशाल परदेशी, बबलू शेख, जावेद लखपती, बापू जगदाळे, राकेश कुंभारे, मुन्ना तांबोळी, विमलबाई शाह, आदित्य कानडे, संतोष राजगुरू व पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.
भुजबळांना पर्याय शिवसेना उबाठा की काँग्रेस ?
नाशिक येथे मंगळवारी भुजबळ आपल्या समर्थकांची बैठक घेणार आहेत. येवला मतदारसंघातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत. यानंतर भुजबळ आपली भूमिका जाहीर करतील, अशी अपेक्षा आहे. भुजबळ यांच्या समोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रीय काँग्रेस असे दोन पर्याय दिसतात.यापैकी भुजबळ कुठला पर्याय निवडतात, याविषयी चर्चा आणि उत्सुकता आहे.