998 Post Views
नाशिक रोड : उमेश देशमुख
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मला उमेदवारी निश्चित मिळेल. अशी खात्री होती. पण अचानक भाजपच्या गणेश गिते यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या जगदीश गोडसे यांनी निष्ठा हरली व पैसा जिंकला असा आरोप केला. राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारली तरी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरून जनतेच्या दरबारात न्याय मागेल, अशी प्रतिक्रिया प्रसिध्दी पत्रकान्वये प्रेस कामगार नेते गोडसे यांनी दिली.
माझ्या सारख्या निष्ठावंतास पक्षाने उमेदवारी नाकारली. यामुळे शरद पवार यांच्या वरील निष्ठा हरली, अन् प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पैशाची ताकद जिंकली, असा गंभीर स्वरूपाचा आरोप देखील गोडसे यांनी केला. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रेस जिमखाना येथे हिंद मजदूर सभेचा अमृतमहोत्सव कार्यक्रम गोडसे यांनी घेतला.
शरद पवार कृषीमंत्री, मुख्यमंत्री झाले, त्यांचा वाढदिवस यांच्या तारखा असलेल्या नोटा देऊन सत्कार केला होता. शरद पवार यांनीही त्यांच्या कार्याची दखल घेतली. पवार यांनी गोडसे यांच्या वास्तुशांतीला आवर्जून हजेरी लावली होती. त्यामुळे गोडसे यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. गोडसे यांनी शरद पवार यांच्या सोबत उत्तम संपर्क ठेवला होता. पवार यांनी देखील गोडसे यांना नाशिक पूर्व मधून उमेदवारी देण्याचे निश्चित केले होते. तसे स्पष्ट संकेत देत मतदार संघात कामाला लागण्याचे निर्देश दिले होते. गोडसे यांनी दोन वर्षापासून कामगार मेळाव्यांचा, कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
नांदूर – मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी लॉन्स

राष्ट्रवादीसाठी गणेश गीते यांचे योगदान सांगा
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मी इच्छुक होतो. मागील दोन ते अडीच वर्षापासून मी राष्ट्रवादी पक्षाकडून पक्षासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. सामान्य जनतेच्या भेटी घेतल्या, कामगारांचे मेळावे घेतले, सतत पक्षाच्या व पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो. विविध कार्यक्रमास उपस्थित राहिलो. शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या सोबत भेटीगाठी घेतल्या. राष्ट्रवादीचे विचार घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले. असे असताना अचानक असे काय घडले,की ज्यामुळे भाजपच्या गणेश गीते यांना उमेदवारी देण्याची वेळ पक्ष नेतृत्वावर ओढवली. उमेदवारी देताना पक्षाने त्यांना कोणते निकष लावले. त्यांचे कोणत्या प्रकारचे योगदान होते, पक्षासाठी ते कितपत झिजले. त्यांचे पक्षासाठी योगदान काय?, असा प्रामाणिक प्रश्न माझ्यासारख्या शेकडो कार्यकर्त्यांसमोर आहे
त्याचे उत्तर कोणता पदाधिकारी देऊ शकतो याचे जाहीर स्पष्टीकरण करायला हवे.



