देवळालीत घोलप यांच्या विरोधात मंडाले मैत्रीपूर्ण लढतीच्या तयारीत!; देवळाली अन् नाशिक पूर्व मध्ये सर्वेच्या नावाखाली राष्ट्रवादीच्या काही युवक पदाधिकाऱ्यांनी इच्छुकांकडून पैसे उकळल्याचा आरोप
देवळाली आणि नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी इच्छुक उमेदवारांकडून सर्वेच्या नावाखाली पैसे उकळले, दलाली केली. अशा दलालांवर जोपर्यंत पक्ष कार्यवाही करीत नाही. तोपर्यंत आमचा एकही पदाधिकारी देवळाली आणि नाशिक पूर्व मतदार संघात प्रचार करणार नाही, असा ठाम निर्णय रविवारी ( दि.२७ ) लक्ष्मण मंडाले यांच्या पाथर्डी येथील फार्म हाऊस मध्ये झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच मंडाले यांनी देवळाली विधानसभा मतदारसंघातून मैत्रीपूर्ण लढत लढवावी, असा आग्रह यावेळी उपस्थितांनी केला.
याप्रसंगी लक्ष्मण मंडाले, मुन्ना अन्सारी, विश्राम बोराडे,सुरेश बोराडे,शरद पेखळे, भाऊ नाना पगार, समाधान कोठुळे, आकाश पिंगळे, राजू झोंबाड आदींनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस देवळाली विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अशोक पाळदे, देविदास चव्हाण, मोतीराम जाधव, शशिकांत ढिकले, संदीप शिंदे, संतोष धात्रक, विष्णू शहाणे, निवृत्ती गोडसे, सोमनाथ रोकडे, शरद कासार, किरण कहांडळ आदी उपस्थित होते.
संजय राऊत पक्ष चालवतात का?.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते संजय राऊत यांच्या मनमानी कारभाराबाबत बोलत नाही, त्यांच्याविषयी मौन बाळगतात, महाविकास आघाडीचा धर्म राऊत पाळत नाही, मध्य नाशिक व देवळाली विधानसभा मतदारसंघात त्यांनी परस्पर उमेदवारी जाहीर केली.त्यांच्याविषयी वरिष्ठ नेते गप्प का बसतात,असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.
गोडसे अन् मंडाले यांच्यावर अन्याय
मागील तीन वर्षापासून नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात जगदीश गोडसे उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. त्यांनी शरद पवार यांचा मेळावा घेतला. मतदारांच्या गाठीभेटी घेत वातावरण निर्मिती केली.त्याचप्रमाणे मागील निवडणुकीत अन्याय झालेले लक्ष्मण मंडाले देखील देवळाली विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी सक्रिय होते.त्यांनी देखील मतदारसंघ पिंजून काढला. गावागावात त्यांनी संपर्क साधून आपण इच्छुक असल्याचे चित्र उभे केले. मुंबईतील नेत्यांनी देखील मंडाले यांच्या उमेदवारीला मान्यता दिली. परंतु ऐनवेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या काही दलाल पदाधिकाऱ्यांनी सर्वेच्या नावाखाली गणेश गीते यांच्याकडून पैसे उकळले. त्याचा निषेध यावेळी करण्यात आला.
नांदूर-मानूर परिसरातील विवाह सोहळ्यासाठी एकमेव सुसज्ज एसी बँक्वेट हॉल संजीवनी लॉन्स
देवळालीत अठरा उमेदवार कसे
देवळाली मतदारसंघांमध्ये इच्छुकांची संख्या वाढविण्यामागे राष्ट्रवादी युवकचेच काही पदाधिकारी आहे.त्यांनी प्रत्येकाला आपण तुम्हाला उमेदवारी मिळवून देऊ,असे आश्वासन दिले. त्यामुळे इच्छुकांची संख्या १८ पर्यंत पोहोचली. या संख्येलाच राज्यातील पदाधिकारी वैतागले. संख्या अधिक निर्माण करून लक्ष्मण मंडाले यांची कोंडी झाली. असा आरोप बैठकीत करण्यात आला.
काय म्हणाले मंडाले
मागील निवडणुकीत पक्षाने मला उमेदवारी दिली नाही. यावेळी पक्षाने तयारीला लागा, असे संकेत दिले. अनेक वेळा वरिष्ठांसोबत चर्चा झाली. उमेदवारी जवळपास निश्चित झाली. पण १८ इच्छूक उमेदवारांमुळे गोंधळ झाला. राज्यस्तरीय वाटाघाटीच्या वादात ही जागा अडकली. संजय राऊत यांनी हस्तक्षेप केल्यामुळे आमची हक्काची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला सोडली. कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की, मी निवडणूक लढवावी. परंतु राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या परवानगीने आम्हाला मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी द्यावी, अशी आम्ही विनंती करणार आहे. राज्यात काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे आम्हालाही परवानगी द्यावी, अशी आमची मागणी आहे.