25.3 C
Nashik
Thursday, February 5, 2026
spot_img

देवळालीची जागा अजितदादांच्या राष्ट्रवादीला ? ; मग भाजप इच्छुकांच्या उमेदवारीचे काय होणार !

1,002 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख
आगामी विधानसभा निवडणुकीत देवळाली विधानसभा मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीत मुख्य लढत होऊ शकते. महायुतीची जागा अजितदादा यांच्या राष्ट्रवादीला तर महाविकास आघाडीची जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे राहील, असा अंदाज बांधला जातो आहे. अंदाज खरा ठरलाच तर भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीच्या तयारीत असणाऱ्या इच्छुकांच्या उमेदवारीचे काय ?, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे प्रचंड मतांनी विजयी झाले. त्यामुळे महाविकास आघाडी मधील राष्ट्रीय काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांचे कार्यकर्ते आणि नेते मंडळी जोमाने आगामी विधानसभेच्या निवडणूक तयारीला लागल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे महायुती मधील शिवसेना शिंदे गट , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट आणि भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते विधानसभेच्या तयारीत दिसतात.

देवळाली विधानसभा मतदार संघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवीन चेहऱ्याच्या उमेदवाराचा शोध घेतला जातो आहे. त्याची मुख्य जबाबदारी राष्ट्रवादीच्या युवा ब्रिगेडवर दिलेली दिसते. शरद पवार, जयंत पाटील यांना अपेक्षित असलेला चेहरा शोधण्यासाठी युवा ब्रिगेड प्रयत्नशील आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाकडून विद्यमान आमदार सरोज अहिरे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते आहे. भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी राजश्री अहिरराव यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. मतदार संघातील प्रचारात त्यांनी सक्रिय सहभाग घेतलेला दिसतो. देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी सदस्य दिवंगत दिनकर आढाव यांच्या कन्या प्रीतम आढाव भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. त्यांचाही मागील काही दिवसांपासून प्रचार सुरू आहे.
थोडक्यात देवळाली विधानसभा मतदारसंघाची जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाकडे जाणार जवळपास निश्चित आहे. त्यांच्या पक्षाकडून विद्यमान आमदार सरोज अहिरे निवडणूक लढवतील. हे पण निश्चित आहे. मग असे असताना राजश्री अहिराव, प्रीतम आढाव यांना भाजप उमेदवारी कोणत्या आधारावर देऊ शकतो. भाजपच्या दोघा इच्छुकांनी मतदार संघात उत्तम जनसंपर्क ठेवलेला आहे. मतदार संघ पिंजून काढत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, महिला, तरुण आणि कार्यकर्ते यांच्या सतत संपर्कात आहे. मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी कष्ट, मेहनत घेत आहे. पण एवढे करूनही जागाच भाजपला मिळणार नसेल तर अहिरराव, आढाव मतदार संघात करीत असलेल्या प्रचाराचा उपयोग काय?, भाजपची उमेदवारी त्यांना कशी मिळू शकते ?, या प्रश्नाचे उत्तर ना भाजपकडे असू शकते, ना अहिरराव, आढाव यांच्याकडे असू शकते , अपक्ष उमेदवारी करणे हा एकमवे पर्याय अहिरराव, आढाव यांच्याकडे असणार आहे. त्यासाठी त्यांच्या समर्थकांना प्रत्यक्ष निवडणुकीची वाट पहावी लागेल.

सुवर्णा दोंदे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत
देवळाली विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टी कडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्या दिवंगत भिकचंद दोंदे यांच्या कन्या सुवर्णा दोंदे यांनी अगोदर चंद्रशेखर राव यांच्या भारतीय राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला. आता नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात प्रवेश केला आहे. देवळाली मतदारसंघ भाजपच्या वाट्याला सुटणार नाही, याची खात्री दोंदे यांना असावी, त्यामुळेच त्यांनी भाजपला राम राम ठोकल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे आता सुवर्णा दोंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट उमेदवारी देतो किंवा नाही, याकडे लक्ष असणार आहे. सुवर्णा दोंदे यांच्याप्रमाणेच पुढील राजकीय भवितव्यासाठी प्रीतम आढाव, राजश्री अहिरराव वेगळा निर्णय घेणार का ? ,याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles