2,021 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
सिन्नर विधानसभा मतदार संघामधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्यास उदय सांगळे इच्छुक आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्यामुळे तीन ते चार दिवसापासून त्यांचा प्रवेश रखडला. दुसरीकडे भाजपचे माजी नगरसेवक गणेश गीते देखील नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघामधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. सांगळे आणि गीते यांच्यापैकी राष्ट्रवादी प्राधान्य क्रमाने कुणाला प्रथम प्रवेश देणार, याविषयी उत्सुकता होती. सोमवारी प्रवेशासाठी गीते यांचे नाव निश्चित झाले. पण मंगळवारी ( दि.२२ ) अचानक सांगळे यांचा प्रवेश झाला. परिणामी गीते यांचा प्रवेश रखडला असून उमेदवारीसाठी आता जगदीश गोडसे आणि अतुल मते यांच्या नावावर विचारमंथन सुरू झाले आहे.
सिन्नर विधानसभा मतदार संघामधून उदय सांगळे यांना उमेदवारी द्यावी की नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघामधून गणेश गीते यांना उमेदवारी द्यावी, असा पेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवड समिती समोर होता. त्यातच येवला विधानसभा मतदार संघामधून कुणाल दराडे यांच्याही नावाची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू होती. एकंदरीत बघितले तर सिन्नर, नाशिक पूर्व आणि येवला विधानसभा मतदारसंघात तीनही इच्छुक एकाच समाजाचे असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोर उमेदवारीसाठी पक्ष प्रवेश कुणाचा करावा अन् कुणाचा करू नये, याविषयी समस्या होती.

जातीय समीकरण साधण्यावर भर
सांगळे यांच्या समर्थकांकडून प्रवेश आम्हालाच मिळावा, यासाठी प्रयत्न केले जात होते. गीते यांच्या समर्थकांकडून देखील प्रवेश आपल्याला मिळावा, यासाठी प्रयत्न केले जात होते. दराडे यांच्या समर्थकांची भूमिका यापेक्षा वेगळी नव्हती. जातीय समीकरण बघितले तर कोणत्या तरी एका मतदार संघामध्ये मराठा समाजाचा उमेदवार देणे आवश्यक होते. तशी मागणी देखील पक्षांतर्गत केली जात होती.त्यामुळे सर्वांचेच प्रवेश रखडले. मंगळवारी ( दि. २२ ) अचानक सांगळे यांचा प्रवेश झाला. परिणामी गणेश गीते यांचा प्रवेश लांबणीवर पडला. त्यांच्या समर्थकांना माघारी फिरावे लागले.



