नाशिक : शिक्षक मतदार संघातील निवडणूक यावेळेला प्रचंड वादातीत होण्याची शक्यता दिसून येत आहे. विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या नावाच्या किशोर प्रभाकर दराडे या इच्छुक उमेदवाराला नाशिकरोड पोलिसांनी आमच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी किमान पाच ते सहा तास नाशिकरोड पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या म्हणजेच आमदार किशोर दराडे यांच्या समर्थकांनी ठिय्या मांडला होता. दराडे यांच्या समर्थकांची समजूत घालतांना पोलिसांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत असल्याचे दिसुन येत होते. नाशिकरोड पोलिसांनी संबधित किशोर प्रभाकर दराडे यांना त्याच्या कुटुंबाच्या ताब्यात दिले. यामुळे शिंदे गटाच्या समर्थकांनी पोलिस ठाण्यातून काढता पाय घेतला.
नाशिक शिक्षक मतदार संघामधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शुक्रवारी ( दि. ७ ) शेवटची मुदत होती. त्यामुळे जवळपास सर्वच इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या नावाचे साधर्म्य असलेल्या किशोर प्रभाकर दराडे या व्यक्तीने उमेदवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे संतप्त झालेल्या आमदार दराडे यांच्या समर्थकांनी संबंधित किशोर प्रभाकर दराडे यांना धक्काबुक्की आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.
यादरम्यान बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करुन दराडे यास ताब्यात घेऊन सुरक्षिततेसठी नाशिक रोड पोलीस ठाण्यात घेऊन आले.यानंतर आमदार किशोर दराडे यांच्या समर्थकांनी आपला मोर्चा नाशिक रोड पोलीस ठाण्याकडे वळवत येथे एकच गर्दी केली.संबंधित इच्छुक उमेदवाराला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी केली. जवळपास पाच ते सहा तास पोलीस ठाण्यात हा राडा सुरू होता.
नाशिक रोड पोलिसांनी किशोर प्रभाकर दराडे यांना आमदार दराडे समर्थकांच्या ताब्यात न देता त्याच्या कुटुंबाच्या ताब्यात दिले. यानंतर सर्व राजकीय नाट्याला पूर्णविराम मिळाल्याने पोलिसांनी देखील सुटकेचा नि:श्वास सोडला. आता आमदार किशोर दराडे यांच्या नावाचे साधर्म्य असलेल्या किशोर प्रभाकर दराडे हे पुढील काळात काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.