नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास नाशिक लोकसभा मतदारसंघाचे सह संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांनी व्यक्त केला.प्रचारादरम्यान वाजे यांना सर्वसामान्य जनतेचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिक लोकसभा मतदार संघामधून दोन महिने अगोदर राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे राजाभाऊ वाजे यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातील सर्वच ठिकाणी प्रचार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. जिल्हा परिषदेच्या १८ गटातील प्रत्येक गावात वाजे यांनी प्रचार केला. भगूर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व सिन्नर नगरपालिका या ठिकाणी देखील वाजे यांनी घराघरात जाऊन प्रचार केला.शहरातील नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम,नाशिक मध्य तसेच देवळाली आणि इगतपुरी विधानसभा मतदार संघातील गावा गावात वाजे यांना प्रचार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. त्याचप्रमाणे महाविकास आघाडी मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट, राष्ट्रीय काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी एकदिलाने वाजे यांच्या प्रचारासाठी मेहनत घेतली. स्वतःहून अनेक ठिकाणी नागरिक राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी पुढे येत असल्याचे चित्र दिसून येत होते.जनतेच्या मनातील खासदार अशी चर्चा प्रचारादरम्यान केली जात असल्याचे निदर्शनास आले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे, संजय राऊत, बानगुडे पाटील, सुषमा अंधारे यांच्या शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी जाहीर सभा झाल्या. सभेदरम्यान नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद वाजे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा ठरेल, असे उबाठाचे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड यांनी म्हटले.