24.3 C
Nashik
Saturday, March 28, 2026
spot_img

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.०’ अंतर्गत ७ मेगावॅट सौर प्रकल्पाचे लोकार्पण ; भऊर ,बगडू आणि विठेवाडी परिसरातील १,३१६ शेतीपंपांना आता अखंडित वीज

109 Post Views

महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा

नाशिकरोड : उमेश देशमुख

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ अंतर्गत मालेगाव मंडळातील देवळा उपविभागामध्ये ७ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्या हस्ते शुक्रवारी भऊर विद्युत उपकेंद्र येथे पार पडले. या प्रकल्पामुळे भऊर, बगडू आणि विठेवाडी या परिसरातील १,३१६ शेतीपंपांना आता दिवसा अखंडित आणि हक्काची वीज मिळणार असून, बळीराजाच्या समृद्धीच्या दिशेने हे एक ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे.

याप्रसंगी उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधताना संचालक राजेंद्र पवार म्हणाले की, “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात सौर ऊर्जेला मोठी गती मिळाली आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचे शासनाचे उद्दिष्ट या प्रकल्पांमुळे यशस्वी होत आहे. यामुळे शेतीच्या विकासासोबत शाश्वत ऊर्जेच्या वापरामुळे पर्यावरणाचे रक्षणही होईल. महावितरण आपल्या ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी सदैव तत्पर आहे, तरी सर्व वर्गवारीच्या वीज ग्राहकांनी आपली वीज देयके वेळेत भरून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन केले.

या सौर प्रकल्पाची एकूण क्षमता ७ मेगावॅट असून, यामध्ये विठेवाडी (४ मेगावॅट) आणि भऊर (३ मेगावॅट) अशा दोन प्रकल्पांचा समावेश आहे. या माध्यमातून भऊर उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या विठेवाडी, भऊर आणि बगडू शिवारातील १,३१६ कृषी ग्राहकांना थेट लाभ मिळणार आहे.

भऊर उपकेंद्र येथे पार पडलेल्या या सोहळ्याला मालेगाव मंडळाचे अधीक्षक अभियंता जगदीश इंगळे, कार्यकारी अभियंता युवराज पाटील व देवेंद्र उंबरकर, देवळा उपकार्यकारी अभियंता दिनेश पवार, तसेच विठेवाडी, भऊर व बगडूचे सरपंच, उपविभागातील सर्व कर्मचारी, ग्रामस्थ आणि आवाडा एजन्सीचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता युवराज पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन अधीक्षक अभियंता जगदीश इंगळे यांनी मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles