212 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
प्रभाग १७ मधील सर्वसाधारण महिला प्रवर्गात काटे की टक्कर पहायला मिळू शकते. याचे मुख्य कारण म्हणजे प्रमिला कैलास मैंद यांची उमेदवारी ठरू शकते.ओबीसी महिला चेहरा अन् सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणूक लढवत असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या दिसतात. त्यामुळेच निवडणुकीत चुरस निर्माण झालेली दिसते.चुरशीची तिरंगी लढत येथे होऊ शकते. उमेदवारांना येथे विजयासाठी शेवटच्या फेरीपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.

महिला सर्वसाधारण प्रवर्गात शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाकडून मशाल चिन्हावर प्रमिला कैलास मैंद, शिवसेना शिंदे गटाकडून धनुष्यबाण चिन्हावर सुशीला विष्णू लोखंडे आणि भाजपकडून शोभा धोंडीराम सातभाई निवडणूक रिंगणात आहे. मागील काही दिवसांपासून प्रमिला मैंद निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झालेले होते. सुरुवातीला त्या भाजपकडून निवडणूक लढवतील असे अपेक्षित होते. परंतु त्यांनी भाजप ऐवजी उबाठा कडून निवडणूक लढविण्यास पसंती दिली. उबाठामध्ये त्यांच्या सोबत पॅनल मध्ये माजी नगरसेवक शैलेश ढगे, माजी नगरसेविका मंगला आढाव आणि माजी नगरसेविका स्व. सुनंदा मोरे यांचे पुत्र मंगेश मोरे आहेत. या सर्वांचे पाठबळ आणि स्वतः व्यक्तिगत कैलास मैंद यांचा मित्र परिवार अशी शक्ती प्रमिला मैंद यांच्यासोबत आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांना त्यांच्या विजयाची अपेक्षा अधिक प्रमाणात वाटत आहे.
मोफत पाणी पाणी पुरवठ्यामुळे प्रसिद्धी !
प्रमिला मैंद आणि त्यांचे पती कैलास मैंद मागील अनेक वर्षापासून समाजसेवेत सक्रीय दिसतात. प्रभाग १७ मधील काही भागात कमी दाबाने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. या समस्यांमुळे येथील महिलावर्ग कमालीचा त्रस्त आहे. त्यांना प्रमिला मैंद यांनी वर्षभर मोफत पिण्याच्या पाण्याची टँकर सुविधा उपलब्ध करून दिली. टँकरद्वारे मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले. यामुळे त्रस्त महिला वर्गाला मोठा दिलासा मिळाला असल्याचे बोलले जात आहे. शिवाय प्रमिला मैंद यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निश्चय वर्षभरापूर्वी केलेले होता. त्यादृष्टीने त्यांचा प्रचार देखील सुरू होता. आजवर प्रभागात व्यक्तिगत प्रचारावर जोर होता. थोडक्यात निवडणुकी पूर्वीच त्या मतदारांच्या संपर्कात दिसतात.
भजनी मंडळे, गणेश मंडळांच्या संपर्कात !
प्रमिला मैंद यांचे पती कैलास मैंद यांचा झोपडपट्टी भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार असतो. काही ठिकाणी स्वखर्चातून गटारी करून दिल्याचे समर्थक बोलतांना दिसतात.तर सार्वजनिक भजनी मंडळे यांना टाळ , मृदुंग आणि गणेश मंडळाना मदत करून कैलास मैंद प्रभागातील जनतेच्या संपर्कात राहून आपल्या सामाजिक कामाचा ठसा उमटवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला दिसतो आहे.




