नाशिकचे पाणी गुजरातला जाते याविषयी सत्ताधाऱ्यांना कल्पना नाही का, महाविकास आघाडी सरकारने हे पाणी नाशिकला मिळावे, यासाठी प्रयत्न केले. पण आताचे सत्ताधारी काय करतात, त्यांनी बघ्याची भूमिका घेऊ नये, कदाचित त्यांना देशाच्या प्रमुखांच्या काही सूचना असेल तर मला माहित नाही. याप्रश्नी लोकसभा निवडणुका आटोपल्यावर तज्ज्ञ लोकांची एक बैठक घेऊन नाशिकचे पाणी नाशिकलाच मिळावे, यासाठी नियोजन केले जाईल. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारासाठी बुधवारी ( दि.१५ ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खासदार शरद पवार बोलत होते. शरद पवार पुढे म्हणाले की, देशाचा खरा मालक आदिवासी आहे. जल, जंगल व जमीन याच्यावर त्याचा हक्क आहे. आदिवासी देशाचा खऱ्या अर्थाने मालक आहे. त्यांच्या विकासासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने डाळिंब, द्राक्ष, ऊस आणि भाजीपाला आदी पिके घेतली जातात. येथील तरुण शेतकरी वर्ग शेती व्यवसायात नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करीत आहे. सह्याद्री फर्म हे उत्तम उदाहरण आहे.नाशिक जिल्ह्या सोबतच बाहेरच्या शेतकऱ्यांना देखील सह्याद्री फर्मचा उपयोग झालेला आहे. अशा तरुण शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची आज गरज आहे.
देशातील ऐक्य राखण्याची जबादारी मोदींवर : शरद पवार
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नाशिकमध्ये आले होते. ते एकमेव असे पंतप्रधान आहेत की, देशाचे ऐक्य जोपासणे ऐवजी ते जात व धर्म यांच्यात अंतर वाढविण्याचे काम करीत आहे. देशाच्या ऐक्याच्या दृष्टीने हे अतिशय घातक आहे. अशी टीका शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.