नाशिक महापालिका शिक्षण मंडळाच्या माजी सभापती तथा माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांची ऑल इंडिया लिनेस क्लबच्या नाशिकरोड अध्यक्षपदी निवड झाली. वसंत उत्सवाच्या इंस्टॉलेशन सेरेमनी अंतर्गत शनिवारी ( दि. ८ ) विहीतगाव येथील मॉम्स विलेज या रेस्टॉरंटमध्ये त्यांचा शपथग्रहण सोहळा मोठ्या दिमाखात तसेच उत्साहात पार पडला. त्यांनी आजवर केलेल्या सामाजिक योगदान व कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली. निवडीबद्दल गायकवाड यांचे सर्वत्र अभिनंदन केले जाते आहे.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मल्टिपल प्रेसिडेंट अंजली विसपुते, मिस इंडिया पॅसिफिक 2024 नंदिनी गवांदे, इंडक्शन ऑफिसर लिनेस ॲडव्होकेट शामलाताई दीक्षित, डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट हेमा गिरधानी आणि निशा नीरगुडे उपस्थित होत्या. त्यांनी नवीन अध्यक्षा सौ. संगिता हेमंत गायकवाड यांच्याकडे क्लबची सूत्रे सुपूर्त केली.यावेळी प्रतिभा कुंभकर्ण (सेक्रेटरी), भारती सुळे (खजिनदार) तसेच मीना पाटील, योगिता चव्हाण, निकिता पवार, स्नेहा झरेकर, सीमा ललवानी, सुजाता गोजरे, कंचन चव्हाण आणि ज्योती तिवारी यांनी सदस्य म्हणून शपथ घेतली. हा शपथविधी ॲड. शामला दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मेघा पिंपळे आणि नीलिमा अवतनकर यांनी केले. शपथग्रहण समारंभानंतर सर्व लिनेस सभासद आणि शिखर स्वामींनी ग्रुपच्या महिला यांची उपस्थिती होती. सोहळ्यानंतर स्नेहभोजनाचा आनंद घेण्यात आला.
विश्वास सार्थ ठरवेन
सामाजिक, राजकीय योगदानाची दखल घेऊन अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल आभार मानते. माझ्यावर दाखविलेला विश्वास कार्यातून सार्थ करून दाखवेन. नवीन जबाबदारी मोठी आहे. समाज हितासाठी आपण या पदाचा उपयोग करू, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित अध्यक्षा संगीता गायकवाड यांनी दिली.