नाशिक रोड येथील नेहरूनगरसमोरी सेंट झेवियर्स शाळेतील जगप्रसिध्द बाळ येशूच्या यात्रेला शनिवारी (दि.८) पारंपारिक उत्साहात सुरूवात झाली. यात्रेसाठी देशभरातून. पहिल्याच दिवशी एक लाखावर भाविक आले. त्यांनी मोठ्या श्रध्देने नवस करत बाळ येशूचे दर्शन घेतले. रविवारी (दि.९) यात्रेचा समारोप होणार आहे. तोपर्यंत सुमारे दोन लाख भाविक दर्शन घेतील, असा अंदाज संयोजकांनी वर्तवला आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, दोनशेच्या वर समर्पित स्वयंसेवक, उत्कृष्ट नियोजन आणि शिस्तप्रिय भाविक ही यात्रेची वैशिष्ट्ये आहेत.
यात्रेत दर तासाला मराठी, इंग्रजी, कोकणी, तमीळ भाषेत मिसा (विशेष प्रार्थना) होत आहे. सकाळी अकराला मुख्य मिसा (विशेष प्रार्थना) झाली. नाशिक प्रांताचे माजी बिशप ल्युडस डॅनिएल, बाळ येशू मंदिराचे मुख्य धर्मगुरू फादर येरेल फर्नांडिस तसेच अन्य फादर उपस्थित होते. बिशप ल्युडयस डॅनियल म्हणाले की, परमेश्वर खूप दयाळू आहे. शक्तीमान आहे. प्रत्येक चांगल्या, वाईट वेळी परमेश्वर आपल्या सोबत असतो. परमेश्वर आपल्याच असतो. आयुष्यातील वादळातून तो आपल्याला तारून नेतो. जीवन अमूल्य आहे. संकटाशी सामना करताना परमेश्वर आपल्या सोबत आहे ही श्रध्दा ठेवा. त्याच्यावर श्रध्दा ठेवली तर तो प्रत्येक संकटात आपल्याला मदत करतो. परमेश्वर नेहमी आपला उध्दार करतो. परमेश्वराने सांगितलेल्या मार्गावर प्रेम आहे. आपली माणसे ओळख देत नाही, प्रेम करत नाही, तेव्हा परमेश्वर आपल्याला जवळ करतो. दरम्यान, यात्रेसाठी नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतूक जेलरोड आणि अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. मंदिराच्या आवारात भाविकांसाठी बांबू लाऊन बॅरकेटींग करण्यात आले आहे.
फादर फर्नांडिस म्हणाले
मिसासाठी शाळेच्या प्रांगणात भव्य शामियाना उभारला जातो. फादर फर्नांडिस म्हणाले की, दुपारी बाराच्या मिसाला हजर असलेले भाविक मिसा संपल्यावर बाहेर गेल्यानंतर लगेच त्यांची मनोकामना पूर्ण होते, असा या भाविकांचा अनुभव आहे. गेल्या वर्षी बाळ येशू यात्रेला गोवा, मुंबई, वसई कोकणसह देश-परदेशातून दोन लाख भाविक आले होते. बाळ येशूचे देशातील हे आगळे वेगळे मंदिर व यात्रा आहे. बाळ येशू यात्रा साठ वर्षापासून यात्रा भरते. दरवर्षी भाविकांमध्ये वाढच होत आहे. या यात्रेत पूर्वी एकच मिसा होते. यंदा १४ मिसा राहणार आहे. पूर्वी तीन हजार भाविक येत असे. आता ही संख्या दोन लाख झाली आहे. भाविकांमध्ये सर्व धर्माचे भाविक येतात, असे फादर फर्नांडिस यांनी सांगितले.