नवऱ्याचे निधन झाल्यावर बायकोसाठी विधवा असा अपमानास्पद शब्दप्रयोग वापरला जातो, त्याऐवजी एकल अथवा पूर्णागिनी शब्द वापरला जाईल. त्याचप्रमाणे यापुढे नवऱ्याचे निधन झाल्यावर बायकोचे कुंकू पुसले जाणार नाही, बांगडी, जोडवी व मंगळसुत्र उतरवले जाणार नाही, असा निर्धार शनिवारी ( दि.१ ) शेकडो महिलांनी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केला.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नाशिक जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या संकल्पनेतून तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेस व झेप फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सन्मान “ती” चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुवासिनी सोबत पूर्णागिनी भगिनीना समानतेच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन भगूर येथे केले होते. आयोजनाचे दुसरे वर्ष आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नाशिक जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या संकल्पनेतून यापुढे भगूर शहरात नवऱ्याचे निधन झाल्यावर बायकोचे कुंकू पुसले जाणार नाही, बांगडी, जोडवी व मंगळसुत्र उतरवले जाणार नाही असा धाडसी निर्णय तथा निर्धार शेकडो महिलांनी व्यक्त केला.
विधवा नाही पूर्णगिनी महिला : प्रेरणा बलकवडे
महिला सन्मानार्थ समाजातील सर्व महिलेला समान वागणुक देण्यात यावी, नवऱ्याचे निधन झाल्यावर विधवा म्हणून बायकोला संबोधले जाते. अश्या महिलेला शुभकार्यास पुढे न येऊ देणे, कुठलेली कार्य असो अथवा इतर बऱ्याच कार्यक्रमांना टाळण्यात येते. अशा स्त्रियांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही धाडसी पाऊल उचलले आहे. त्याला समाजाने पुढे येऊन पाठिंबा द्यायला हवा. संकुचित दृष्टिकोन अन विखुरलेल्या विचारांना, मानसिकतेला अळा बसेल. विधवा असा शब्दप्रयोग न वापरता एकल किंवा पूर्णागिनी असा शब्दप्रयोग वापरावा.सुवासिनी प्रमाणेच त्यांचा सन्मान व्हावा, यासाठी एक पाऊल भगूरकर महिलांनी पुढे टाकले आहे. त्या समाजाने पाठिंबा द्यावा असे प्रेरणा बलकवडे यांनी सांगितले.
प्रसिद्ध अँकर आदित्य यांची उपस्थिती
हळदी-कुंकू कार्यक्रमानिमित्त महिलांसाठी विविध खेळ सेलिब्रीटी अँकर आदित्य यांच्या उपस्थितीत घेण्यात आले. यावेळी महिलांनी खेळांचा आनंद लुटला व नविन विचारांचे वाण घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पडला. या कार्यक्रमास आयोजक राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, प्रेमलता राजगुरु, योगिता चव्हान, सायरा शेख, भोर, वर्षा लिंगायत, भारती बलकवडे, शितल बलकवडे, सुरेखा निमसे, रोहिनी बलकवडे, भारती साळवे, जिजाबाई जाधव, हर्षदा सुर्वे, निशा पुजारी,आदिंसह असंख्य महिला उपस्थित होत्या.