मन संवादाच्या माध्यमातून महिलांना सकारात्मक जीवनशैली कशी अंगीकारावी यासाठी मदत मिळते. मनाच्या संवादाने महिलांना आत्मविश्वास आणि नवचैतन्य प्राप्त होते. आपल्या मनाला जो ओळखतो त्याला खरे , खोटे, अवास्तव, वास्तव समजते. थोडक्यात जो स्वतःच्या मनाला ओळखायला शिकतो त्याला त्याचे खरे अस्तित्व समजते. असे प्रतिपादन डॉ. वृषिनीत सौदागर यांनी केले.
नाशिकरोड येथे शिखरस्वामिनी बहुउदेशिय महिला संस्था वतीने ऋतुरंग भवन, नाशिकरोड येथे शुक्रवारी ( दि. २४ ) महिलासाठी आरोग्य मार्गदर्शन शिबीर व हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला. त्यावेळी डॉ. वृषिनीत सौदागर बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन दीप्ती राजाभाऊ वाजे, वनिला वृषिनींत सौदागर, नंदिनी राजपूत गवांदे, मिसेस एशिया पॅसिफिक होते. यावेळी नाशिकरोड जेलरोड शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष योगेश गाडेकर, सरचिटणीस – प्रशांत कळमकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन शिखर स्वामिनी बहुउद्देशीय महिला संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा संगीता हेमंत गायकवाड यांनी केले.
संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हा समारंभ यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. हळदी कुंकू समारंभाच्या माध्यमातून महिलांनी एकता, स्नेहभावना आणि सशक्तीकरणाचा संदेश दिला. याप्रसंगी स्मिता मुंडे ,मीना पाटील, सीमा ललवानी ,कांचन चव्हाण ,सुजाता गोजरे, अनुसया गवळी, सुजाता गवांदे, दीप्ती करडेल, विद्या सोनार, निशा निरगुडे, विजया रेंगे, आरती अहिरे, रचना चिन्तवाल, स्मिता पाटील आदी उपस्थित होते.
हळदी – कुंकवाच्या परंपरेचा अभिमान
भारत हा कृषी प्रधान देश मानला जातो.पूर्वी शेतीच्या कामात सर्व महिला व्यस्त असल्याचे दिसत होते. त्यांना पुरेसा रिकामा वेळ मिळत नव्हता.त्यामुळे शेतीचे काम आटोपल्यानंतर सर्व महिलांनी एकत्र येऊन हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. तेव्हापासून ही प्रथा परंपरा सुरू आहे. वेळेनुसार या कार्यक्रमाच्या स्वरूपात बदल होत गेला. आजही परंपरा जोमात सुरू असल्याचा अभिमान वाटतो, असे आयोजक संगीता गायकवाड यांनी म्हटले.