माझे पोस्टरवरून फोटो काढले, शिंदे गटात गेले मला विचारले नाही. मग, मी आता काय शब्द देऊ तुम्हाला? हे शब्द आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि उदय सांगळे यांच्या संवादातील! कधी काळी एकमेकांचे कट्टर सहकारी असलेले सांगळे शिंदे गटाच्या वळचळणीला गेल्याने वाजे यांनी एकप्रकारे नाराजीच बोलून दाखविली.
मितभाषी म्हणून ओळखले जाणारे वाजे यांना मनीध्यानी नसतानाही लोकसभेची उमेदवारी मिळाली. माजी आमदार म्हणून त्यांनी यापूर्वी सिन्नर तालुक्यात काम केलेले असल्यानेच त्यांना ही संधी चालून आली. मितभाषीच असल्याने वाजे यांचे सर्वपक्षीय नेत्या-कार्यकर्त्यांशी तसे सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळेच की काय, त्यांना उमेदवारी जाहीर होताच केवळ उध्दव ठाकरे यांचीच शिवसेना नव्हे तर शिंदे यांचीही शिवसेना कामाला लागल्याचे बोलले जात आहे. जोडीला अजित पवार यांची राष्ट्रवादी आहेच. याच ओघात सांगळे आणि वाजे यांची भेट झाल्याचे बोलले जाते.
आमदार होण्याची महत्वकांक्षा बाळगून असलेल्या सांगळे आणि वाजे यांचे एके काळी घनिष्ठ संबंध होते. किंबहुना सांगळे यांच्या सौभाग्यवती शितल सांगळे यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर विराजमान करण्यासाठी वाजे यांची त्यावेळची भुमिका महत्वपूर्ण ठरली होती. मंत्री दादा भुसे यांच्याकडे वाजे यांनी सांगळे यांचे नाव लावून धरले होते. दरम्यानच्या काळात शिवसेनेचे गट अस्तित्वात आल्यानंतर वाजे ठाकरे गटातच राहिले तर सांगळे यांनी शिंदे गटात अप्रत्यक्षरित्या प्रवेश केला. पालकमंत्री भुसे यांच्या आशिर्वादाने जिल्ह्याचे नियोजन त्यांनी सांभाळले. याच सांगळे यांना आता पुन्हा वाजे यांची आठवण झाली. वाजे निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे निमित्त साधून सांगळे यांनी त्यांची भेट घेतल्याचे बोलले जाते. या भेटीत आता मदत करण्याच्या बदल्यात वाजे यांनी भविष्यासाठी शब्द द्यावा, अशी अपेक्षा सांगळे यांनी व्यक्त केल्याचे बोलले जाते.
त्यावर वाजे यांनी नाराजी व्यक्त केल्याचेही सांगितले जाते. तुम्ही शिंदे गटात प्रवेश केला, पोस्टर-बॅनरवरून माझा फोटो हटविला, मी काय तुम्हाला शब्द देऊ, अशा शब्दात त्यांनी सांगळे यांच्याकडे नाराजी बोलून दाखविली. त्यामुळे इच्छा असूनही वाजे यांना मदत करण्यात येत नाही, अशी सांगळे यांची स्थिती झाली आहे.
सिन्नरच्या राजकारणात वाजे, सांगळे आणि आमदार माणिक कोकाटे यांनी आजपर्यंत महत्वपूर्ण भुमिका बजाविली आहे. किंबहुना सांगळे-वाजे यांनी मिळून कोकाटे यांचा विरोध केल्याचे अनेकदा दिसून आले आहे. जिल्हा परिषदेत शितल सांगळे अध्यक्ष असताना प्रशासकिय कामकाजाच्या निमित्ताने त्याचे प्रत्यंत्तरही आले. ज्याप्रमाणे उदय सांगळे यांना आमदार होण्याची इच्छा आहे, तद्वत कोकाटे यांच्या कन्या सिमंतिनी कोकाटे ह्याही विधानसभेची पायरी चढण्यासाठी उत्सुक आहेत. अर्थात माणिक कोकाटे हेच कन्येला राजकारणात स्थिरस्थावर करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच वाजे खासदार होणे, हे कोकाटे असो की वाजे यांच्यासाठी आपोपच रस्ता साफ होण्यासारखे आहे. त्यामुळेच वाजे यांना सढळ हाताने मदत करण्याची या दोघा नेत्यांची सुप्त इच्छा लपून राहू शकलेली नाही.