देवळाली विधानसभा मतदारसंघ आणि दिंडोरी विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाने एबी फॉर्म दिले. या उद्भवलेल्या परिस्थितीला समीर भुजबळ हेच कारणीभूत असल्याचे सर्वश्रुत आहे. दिंडोरीतून संबंधित उमेदवाराने माघार घेतली. परंतु देवळालीचा पेच कायम आहे. याबाबत तोडगा काढण्यासाठी शिवसेना शिंदे गट बैठक घेणार आहे. त्यामध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घ्यायचा की त्यांना पाठिंब्याचे जाहीर पत्र द्यायचे, याविषयी निर्णय होईल.अशी माहिती माजी खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.
महायुतीमध्ये राज्यात काही मतदार संघात बंडखोरी झाली नांदगाव मतदान संघामध्ये देखील यापेक्षा वेगळे चित्र नाही. त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही दिंडोरी आणि देवळाली मतदारसंघातील अपक्ष उमेदवारांना एबी फॉर्म वाटले. यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली. चर्चेत आप-आपसातील बंडखोरी टाळण्यासाठी एबी फॉर्म मागे घेण्याचा निर्णय झाला. संबंधित उमेदवारांना तो निर्णय कळविण्यात आला. पण देवळाली विधानसभा मतदार संघाच्या राजश्री अहिरराव यांनी माघार घेतली नाही. परिणामी देवळालीत घोळ झाला. त्यावर तोडगा काढण्यासाठी शहरात बुधवारी ( दि.६ ) सायंकाळी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. यामध्ये अंतिम निर्णय घेण्यात येईल. असे गोडसे यांनी सांगितले.
नांदूर – मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज एसी बँक्वेट संजीवनी लॉन्स
महायुतीचे संघटन व समन्वय महत्त्वाचे
माजी खासदार गोडसे यांनी सांगितले की, निवडणूक लढविण्यासाठी खूप महिने अगोदर तयारी करायला हवी. ऐनवेळी एबी फॉर्म देऊन उमेदवार उभा केला, किंवा एखाद्या अपक्ष उमेदवारास एबी फॉर्म देऊन अधिकृत केले तर निवडणूक जिंकणे अवघड आहे. यापेक्षा देवळालीत विद्यमान आमदार सरोज अहिरे यांना पाठिंबा देऊन त्यांना निवडून आणणे, हे महायुतीच्या राज्यातील ज्येष्ठ नेत्यांना नक्कीच आवडेल. असे माझे मत आहे.