नाशिकरोड : उमेश देशमुख
नाशिकचे माजी खासदार तथा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते देविदास पिंगळे लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. त्यामुळे जिल्हयातील अजित पवार गटाला मोठा धक्का बसू शकतो.गुरूवारी ( दि.११ ) शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान माजी खासदार पिंगळे यांचे पुतणे आकाश पिंगळे यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला.
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले असून निवडणूक पूर्व तयारीला लागलेले दिसून येत आहे. त्यामुळे पिंगळे यांच्या पक्ष प्रवेशाला महत्व प्राप्त होऊ शकते. माजी खासदार पिंगळे यांच्या प्रवेशाने शरद पवार गट मजबूत स्थितित येईल. तसेच विशेष करून देवळाली विधानसभा मतदार संघात पक्षाला मोठी मदत होईल, असा दावा कार्यकर्त्यांकडून केला जातो आहे.
पिंगळे पूर्वाश्रमीचे शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. पिंगळे यांना विधान परिषदेचे आमदार, खासदार करण्यात शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरलेली होती. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यावर पिंगळे यांनी शरद पवार यांच्या सोबत जाणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी अजितदादा यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे जिल्ह्यातील निष्ठावंत मध्ये नाराजीचा सूर होता. परंतू पिंगळे पुन्हा स्वगृही परतणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने अजित पवार यांच्या गटात अस्वस्थता निर्माण होऊ शकते.
तालुका युवक कार्यकारिणी बरखास्त
नाशिक तालुका कार्यकारिणीची बैठक जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत नाशिक तालुका कार्यकारणी बरखास्त करण्यात आली. पुढील आठ दिवसात नाशिक तालुका दौरा करून नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे. गावातील गटप्रमुख, गनप्रमुख, गावप्रमुख आदी. सर्व नियुक्त येत्या आठ दिवसात जाहीर करणार असल्याचा निर्णय झाला. याप्रसंगी प्रदेश युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलक तालुकाप्रमुख रामकृष्ण झाडे, सुनील कोथमिरे, विष्णू थेटे,काळू कटाळे, दीपक वाघ, निवृत्ती कापसे आदी. उपस्थित होते.