नाशिकरोड : प्रतिनिधी
माजी महापौर दशरथ पाटील यांनी नाशिक शहरात २००२ ते ०५ दरम्यान “खड्डे दाखवा अन् एक हजार रुपये मिळवा” अशी यशस्वी योजना राबवली होती. रस्त्यावर खड्डा दिसला तर प्रभागातील संबधित अधिकाऱ्यास एक हजार रुपये भरावे लागत होते. सद्या शहरात सर्वत्र खड्डे पडलेले दिसतात. नाशिकरोड परिसरातील जेलरोड रस्त्याची तर प्रचंड दुरावस्था झाली आहे. दशरथ पाटील यांनी सिडको प्रमाणेच जेलरोड रस्त्याची पाहणी करुन अधिकाऱ्यांना जाब विचारायला हवा, अशी मागणी केली जाते आहे.
माजी महापौर दशरथ पाटील यांनी शनिवारी ( दि.२९ ) रोजी सिडको विभागातील गामने स्टेडियम समोरील जायभावे नगर येथील रस्त्यांची तसेच पाटील नगर, संत गाडगे महाराज उद्यान समोरील आणि उंटवाडी ते त्रिमूर्ती सिग्नल रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी केली.
त्याचप्रमाणे सातपूर विभागातील मॉडर्न शाळे समोरील रस्त्यांवरील खड्यांची पाहणी केली. आतापर्यंत पुरेसा पाऊस सुरू झालेला नाही, तरी रस्त्यांवर जीवघेणे खड्डे पडलेले दिसतात. सतत मुसळधार पाऊस पडला तर खड्डे पडलेल्या रस्त्यांची अवस्था अधिक बिकट होईल. कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ते तयार केले जातात. परंतु एक वर्षाच्या आत रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय होते. महापालिका प्रशासन आणि अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते त्याचप्रमाणे आजी-माजी लोकप्रतिनिधी देखील याविषयी गप्प आहे. रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवले नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा माजी महापौर दशरथ पाटील यांनी दिला आहे.