विशेष प्रतिनिधी :
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. त्यामुळे आघाडीतील नेते, पदाधिकारी अन् कार्यकर्ते मोठया उत्साहात दिसतात. आगामी विधानसभेत देखील लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती व्हावी, यासाठी मुख्य नेते प्रयत्नशील आहे. त्यासाठी वेळ पडलीच तर काही जागेच्या आदला – बदलीची देखील तयारी दर्शविण्यात येत आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील दोन विधानसभा जागेचा सामावेश असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
नाशिक जिल्ह्यातील जनता जनार्दन हे शरद पवार यांच्या पाठीमागे उभी असल्याचा आजवरचा इतिहास आहे. पुलोद आघाडी अन् राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची १९९९ मध्ये झालेली स्थापना आणि जिल्ह्यातील मतदारांनी दिलेला प्रतिसाद उत्तम उदाहरण मानले जाते. ग्रामीण भागातील म्हणजेच शेतकरी वर्ग तर शरद पवार यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो. पवार साहेब सांगतील तिच पूर्वदिशा अशी मानसिकता असलेला शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने आहे.
यात प्रामुख्याने सहकारी साखर कारखाने असलेले तालुके तर पवार यांनी आवाज देताच त्यांच्या मागे तन, मन, धनाने उभे राहतात. यामध्ये निफाड, नाशिक ग्रामीण म्हणजे देवळाली विधानसभा, सिन्नर आणि दिंडोरी विधानसभा मतदार संघाचा सामावेश आहे. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक, पुणे आणि मराठवाडा तसेच विदर्भ येथील काही मतदार संघात अदला बदल होऊ शकते. यामध्ये निफाड, देवळाली मतदार संघाचा समावेश असल्याची चर्चा केली जाते आहे.
बदलावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठाम
लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने क्षमता असून देखिल कमी जागा घेत समजूतपणा दाखविला. विजयाची सरासरी देखील इतर पक्षापेक्षा अधिक आहे. उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रीय काँग्रेस पेक्षा कमी जागा लढविलेल्या आहे. महाविकास आघाडीत जागा वाटपात वाद नको, मोदी सरकारला स्पीडब्रेकर तयार व्हावे, म्हणून आम्ही कमी जागा लढवत नमती भुमिका घेतली. पण यावेळेला स्थिती वेगळी असुन आम्ही नमते घेणार नाही, लोकसभेत राष्ट्रवादीने दाखविलेला समजूतदारपणा आता विधानसभा निवडणुकीत उबाठा आणि काँग्रेस पक्षाने दाखवावा, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेतलेली दिसते.
येथे साटलोटे होण्याची शक्यता ?
नाशिक जिल्ह्यातील देवळाली विधानसभा मतदारसंघात माजी आमदार योगेश घोलप हे उबाठाकडून इच्छूक आहे. तर विद्यमान आमदार सरोज अहीरे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रादीबरोबर आहे. त्यामुळे शरद पवार गटाकडून उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार योगेश घोलप यांनाच उमेदवारी देण्याचे प्रयत्न वरिष्ठ पातळीवर सुरू केले आहे. माजी आमदार योगेश घोलप हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार होऊ शकतात. निफाड मतदार संघामध्ये उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून माजी आमदार अनिल कदम इच्छूक आहे. येथे देखील अजितदादा पवार यांच्या गटाचे दिलीप बनकर आमदार आहे. देवळाली प्रमाणेच शरद पवार गटाला ही जागा हवी असून ते माजी आमदार अनिल कदम यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे. देवळाली आणि निफाड जागा आपल्या कोठ्यात घेऊन अजित पवार यांना धडा शिकाविण्याचा निर्धार शरद पवार गटाचा आहे. त्याबदल्यात उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला पुणे, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जागा अन् राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छूक असणारे उमेदवार उबाठाला दिले जाणार असल्याचे बोलले जाते आहे.२०१९ विधानसभा निवडणुकीत इगतपूरी मतदार संघात राष्ट्रवादीने हिरामण खोसकर यांना राष्ट्रीय काँग्रेस पक्षात पाठवत आमदार केले होते. अगदी त्याचप्रमाणे देवळाली आणि निफाड विधानसभा मतदार संघात घडले तर आश्चर्य वाटायला नको..
जिंकेल त्याची जागा हेच सूत्र : खा. संजय राऊत
लोकसभा निवडणुकी पूर्वी खासदार संजय राऊत यांनी जिंकेल त्याची जागा असे आमचे जागा वाटपाचे सूत्र असल्याचे जाहीर वक्तव्य केले होते. लोकसभेत घडलेही तसेच. त्याचप्रमाणे यावेळेला होईल, याची अधिक शक्यता वर्तवली जात आहे.