इगतपुरी : विक्रम पासलकर
प्रभू रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथील ८६ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाची आगळी वेगळी कामगिरी पाहून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले जात आहे. तरुणांना देखील लाजवेल असे काम ८६ वर्षाच्या आजोबांनी करून दाखवले आहे. त्यामुळे ते सर्वत्र चर्चेचा विषय ठरताना दिसून येत आहे.

आबाजी बारे बाबा यांनी अवघ्या दोन तासांत ऐतिहासिक रतनगड किल्ला सर केला. सह्याद्रीच्या दुर्गम आणि खडतर वाटांवर मात करत त्यांनी दाखवलेले हे अफाट धाडस आणि शारीरिक क्षमता खरोखरच थक्क करणारी आणि आजच्या तरुणांना लाजवणारी आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील समुद्रसपाटीपासून सुमारे ४,२५० फूट उंचीवर असलेला किल्ले रतनगड हा त्याच्या चढणीसाठी आणि ‘नेढे’ (खडकातील नैसर्गिक आरपार छिद्र) या वैशिष्ट्यासाठी प्रसिद्ध आहे. जेष्ठ नागरिक आबाजी बारे यांनी या वयातही मंगळवार ता.०६ रोजी केवळ २ तासांत हा ट्रेक पूर्ण करून एक नवा आदर्श घालून दिला आहे.
८६ व्या वर्षीही आबाजी बारे यांचा उत्साह कोणत्याही कसलेल्या ट्रेकरपेक्षा कमी नव्हता.रतनगडाची चढण काही ठिकाणी अत्यंत तीव्र आणि शिड्यांची आहे, तरीही त्यांनी न थकता हा टप्पा पार केला.याचे पर्यटक बांधव साक्षीदार आहे.
रतनगडावर ८६ वर्षांचे जेष्ठ नागरिक आबाजी बारे बाबा यांना बघताच महाराष्ट्राच्या नव्हे तर भारत देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पर्यटकांना सुद्धा त्यांच्या सोबत सेल्फी फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.
आजपर्यंत च्या इतिहासात ८६ वर्षांचे ट्रेकर्स म्हणून आबाजी बारे बाबा एकमेव ट्रेकर्स असतील की ज्यांनी रतनगड सर केला.आजच्या धावपळीच्या युगात तंदुरुस्ती आणि इच्छाशक्ती असेल तर वयाचे बंधन कधीही आड येत नाही, हेच त्यांनी आपल्या या आजच्या कृतीतून सिद्ध केले आहे. मंगळवार ता.०६ रोजी सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांच्यासोबत दुचाकीने जेष्ठ नागरिक आबाजी बारे हे रतनगड ट्रॅकिंग साठी सकाळी ९:०० वाजता पोहचले.

अमृतेश्वर मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी रतनगड ट्रेकिंगकडे वाटचाल सुरू केली कडक उन्हात तब्बल दोन तासांत तरुणांच्या बरोबरीने जेष्ठ नागरिक आबाजी बारे यांनी हनुमान व गणपती दरवाजा कडून रतनगडाची चढाई पूर्ण केली व गडावरील बुरुज व त्यानंतर निसर्गरम्य सोनकीच्या फुलांचा आनंद घेत गडावरील शिवलिंगाचे दर्शन घेत डोंगरातील नेडे छिद्र मध्ये जाऊन राष्ट्रध्वज फडकावत जेष्ठ नागरिक आबाजी बारे यांनी आनंद साजरा केला. कल्याण दरवाजा दिशेने उतरत एक तासांत गडावरून खाली उतरले.
याअगोदर सुद्धा आबाजी बारे यांनी मराठा विद्या प्रसारक समाजाचे नाशिक येथे भरविण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत लगातार तीन वेळा सहभाग नोंदविला असून जेष्ठ नागरिकांमध्ये पाच किमी च्या स्पर्धेत त्यांनी सलग तीन वेळा राज्यात तिसरा क्रमांक पटकावला असून या उतार वयात सुद्धा बाबा ट्रॅकिंग,धावण्याच्या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवितात.
तसेच ग्रामपंचायत टाकेद येथील ते माजी ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत तर विद्यमान विविध विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक सुद्धा आहेत.यासोबत बांधकाम खात्यातून ते दोन हजार सालात सेवानिवृत्त झाले असून पंचवीस वर्षात त्यांनी पूर्णतः भारत भ्रमंती देवदर्शन पूर्ण केले आहे.
एकदा तरी विदेशात जाण्याचे त्यांचे स्वप्न असून येणाऱ्या नवरात्र उत्सवात ते महाराष्ट्रातील सर्वोच्च असलेले कळसुबाई शिखर सर करणार आहेत.यासोबतच बितनगड,हरिहर किल्ला सुद्धा सर करण्याचा त्यांचा माणसं आहे.



