आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी दिंडोरी तालुक्यातील गट अन् गणाच्या आरक्षणाची सोडत सोमवारी ( दि.१३ ) जाहीर केली जाणार आहे. याकडे सर्वच इच्छुकांचे लक्ष लागले असून आपल्या राजकीय सोयीची आरक्षण सोडत निघावी, यासाठी इच्छुकांच्या जीवाची घालमेल सुरू असल्याचे चित्र तालुक्यातील राजकीय वर्तुळात दिसून येते आहे.
दिंडोरी तालुक्यातील सहाही गट अनुसूचित जामातीसाठी राखीव होणार अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती, सोशल मीडियावरही त्याबाबत खमंग चर्चा झाली. मागील निवडणुकीतही सर्व गट अनुसूचित जमातीसाठी राखीव होते. या चर्चांमुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तयारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले होते.अनेक इच्छुकांनी आपापल्या जिल्हा परिषद गटात मोर्चैबांधणी केली होती, गेल्या आठ वर्षांपासून स्थगिती असलेल्या निवडणुकीचा मार्ग कोर्टाच्या आदेशाने मोकळा झाला असून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी सोमवार ता,१३ आक्टोंबर रोजी आरक्षण सोडत निघणार आहे, आगामी निवडणुकीत आपल्या गटात,गणात अपेक्षेप्रमाणे आरक्षण निघावे यासाठी ईच्छुक देव पाण्यात बुडवून बसले आहेत, माजी जिल्हा परिषद सदस्यांसह अनेक नवीन तरुण उमेदवारही आगामी निवडणुक लढवण्यास इच्छुकआहेत.
आरक्षण सोडतीत कोणत्या गटाचे आरक्षण कसे निघते ह्यावरच आगामी निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे,सर्वांचे लक्ष आता आरक्षण सोडतीकडे लागले आहे, दिंडोरी पंचायत समितीचे सभापती पदाचे आरक्षण याआधीच जाहीर झाले आहेत.
राजकीय पक्षांचे नेते,कार्यकर्त्यांसाठी आवाहन
दिंडोरी पंचायत समिती निवडणुकीसाठी १२ गणांची आरक्षण सोडत सोमवारी ता,१३ आक्टोंबर रोजी सकाळी १२ वाजता उपविभागीय कार्यालयात काढण्यात येणार असून यावेळी सर्वच राजकीय पक्षांच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ आप्पासाहेब शिंदे यांनी केले आहे.