आर्टिलरी सेंटर रोडवरील गाडेकर मळा येथील जॉगिंग ट्रॅकची दुरावस्था झाली आहे. वाढलेल्या गवतामुळे डासांचा प्रादुर्भाव झाला असून लहान मुलांच्या खेळण्या व ग्रीन जीमही तुटली आहे.
याबाबत उपाययोजना करण्याची मागणी चंद्रधवन कुलकर्णी, विजय राऊत, सागर गोसावी, महेश ताजनपुरे, नितीन बागूल, तृशांत बनभेरू, महेश देवळालकर, उत्तम धात्रक अनिल लोहारकरआदी नागरिकांनी केली. काँग्रेसचे ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या विभागीय अधिकारी यांना अधिका-यांना निवेदन देण्यात आले. त्याचा आशय असा – गाडेकर मळा जॉगिंग ट्रॅकवरील झाडांच्या छाटलेल्या फांद्या तेथेच पडून आहेत. गवत वाढले आहे. ट्रॅकवर मुरूम नसल्याने चिखल झाला असून ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले यांना चालता येत नाही. प्रवेशव्दाराचे पत्रे तसेच घसरगुंडी, झोके तुटले आहेत. ध्वनी व्यवस्था बंद असल्याने फिरायला येणा-यांना सुंदर गाणी, संगीताचा आस्वाद घेता येत नाही. ग्रीन जीम येथे पाणी साचत असून गवत वाढल्याने व्यायाम करता येत नाही. डासांमुळे रोगराई पसरत आहे. त्वरित उपाययोजना करावी.