नाशिकरोड : उमेश देशमुख
आसनगाव-कसारा तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामासह कसारा यार्डमधील ‘अप’ यार्ड लाइन विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेने ७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान १२ दिवसांचा विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकचा पहिला टप्पा ७ ते ९ ऑक्टोबर दरम्यान राहणार आहे.

ब्लॉकमुळे पंचवटी, राज्यराणी, गोदावरी या नाशिककरांसाठी उपयुक्त गाड्यांना मुंबईहून येताना सुमारे २५ मिनीटे उशीर होत आहे. मुंबईला जाताना या गाड्यांना फारसा उशीर होत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.ब्लॉकचा थेट परिणाम नाशिक जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांवर होत आहे. विशेषतः मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या प्रवाशांना या कालावधीत रेल्वे वेळापत्रकातील बदलांचा सामना करावा लागत आहे.
८ ऑक्टोबरला दुपारी ३.३५ ते रात्री ८.३५ या वेळेत कसारा-खर्डी तसेच उंबरमाळी-कसारादरम्यान दोन्ही मुख्य मार्गांवर ब्लॉक राहील. नाशिककडून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना आसनगाव येथे रेल्वे बदलण्याची वेळ येऊ शकते. त्याशिवाय इगतपुरी स्थानकावर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचे नियमन करण्यात येणार आहे. गोरखपूर-एलटीटी, पुष्पक, अयोध्या कॅन्ट-एलटीटी, बलिया-दादर आणि ज्ञानेश्वरी एक्स्प्रेससह काही गाड्यांना इगतपुरीत ठराविक कालावधीसाठी थांबविण्यात येणार आहे.



