नाशिक रोड : उमेश देशमुख
सुप्रेम मेडिकल अँड एज्युकेशन फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ नाशिक सुप्रीम यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना ‘नाशिकरोड रत्न’, तसेच आदर्श शिक्षकांना ‘शिक्षक रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. पत्रकारिता क्षेत्रात बहुमोल योगदान देणारे ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र तनपुरे यांना यावेळी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व व्यापारी बँकेचे संचालक डॉ. प्रशांत भुतडा यांनी दिली.

रविवार, ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता आर्टिलरी सेंटर रोड येथील माहेश्वरी भवन येथे हा पुरस्कार सोहळा होणार आहे. कार्यक्रमास पोलीस उपायुक्त किशोर काळे तसेच गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव दीप्ती देशपांडे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये सामाजिक क्षेत्रासाठी शिवाजी हांडोरे, राजकीय क्षेत्रासाठी प्रभाग सभापती रमेश धोंगडे, प्रशासकीय क्षेत्रासाठी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, पत्रकारिता क्षेत्रासाठी चंद्रकांत बर्वे, वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ. काशिनाथ बुवा, कलाक्षेत्रासाठी मानसी सागर आणि औद्योगिक क्षेत्रासाठी किशोर राठी यांना ‘नाशिकरोड रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तसेच नगरसेवक कैलास मुदलियार यांच्या बालाजी सोशल फाउंडेशन या संस्थेलाही ‘नाशिकरोड रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
आदर्श शिक्षक म्हणून कविता मातेरे, भावना सोनवणे, कविता धारणे व डेव्हिड रोहम यांना ‘शिक्षक रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. श्रीपाल शहा हे ‘स्ट्रोक व मायग्रेन’, तर पोटविकार तज्ज्ञ डॉ. धवल चोकसी हे ‘सर्व आजारांचे मूळ पोटाशी?’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.



